पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:20 AM2018-09-06T00:20:06+5:302018-09-06T00:20:45+5:30
विनयभंगासह भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींना वर्धेच्या न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडी मिळविल्याने आरोपींना हिंगणघाट येथे परत नेल्या जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट / वायगाव (नि.) : विनयभंगासह भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींना वर्धेच्या न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडी मिळविल्याने आरोपींना हिंगणघाट येथे परत नेल्या जात होते. वायगाव (नि.) येथे लघुशंकेचा बहाना करून एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मंगेश कोडापे (२५) असे पळालेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंगणघाटचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रजेवर असल्याने पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केलेल्या राहुल उईके (२१) व मंगेश कोडापे (२५) या दोघांना पोलिसी वाहनाने वर्धेच्या न्यायालयात नेण्यात आले. तेथे न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून दोन्ही आरोपींना शुक्रवार ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना घेवून हिंगणघाट पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी हिंगणघाटच्या दिशेने परतीचा प्रवास करीत असताना वायगाव (नि.) शिवारात मंगेशने लघुशंकेचा बहाना केला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी एम. एच. ३२ जे ०१७८ हे शासकीय वाहन थांबविले. याच दरम्यान आरोपी मंगेश कोडापे याने संधीचे साने करीत पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला.
पीडितेच्या पालकांमध्ये दहशत
ज्या गुन्ह्यात सदर दोन्ही आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे तो गुन्हा गंभीर गुन्ह्यात येतो. शिवाय अटकेत असलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी चक्क पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याने गावात व पीडितेच्या कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पसार आरोपीला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी सुजान नागरिकांकडून होत आहे.
कारणांबाबत शंका
पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पसार झाल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोपीने लघुशंकेचा बहाणा करून पळ काढल्याचे पोलिसांच्यावतीने सांगितले जात असले तरी कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी चहा पिण्यासाठी घटनास्थळी थांबले होते. याच दरम्यान अधिकारी व कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे हा आरोपी पसार झाल्याची चर्चा हिंगणघाट शहरात आहे.