आरोपीच्या पोलिसांना वाकुल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:56 AM2017-09-23T00:56:10+5:302017-09-23T00:56:24+5:30
बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश साठे हा बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत आला असल्याची पोलिसांना माहिती मिळताच बँकेला घेराव घातला; .....
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश साठे हा बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत आला असल्याची पोलिसांना माहिती मिळताच बँकेला घेराव घातला; पण आरोपीला सुगावा लागताच तो चारचाकी वाहनात बसून पसार झाला. यात पोलिसांची पळापळ झाली. दोन तासाने तो परत बँकेत आल्याची माहिती मिळताच ठाणेदार निशीकांत रामटेके यांनी अटकेचा प्रयत्न करताच त्याने अटकपूर्व जामीन दाखल केला. यामुळे खरांगणा पोलीस ठाण्यात तीन तास चांगलाच गोंधळ उडाला.
खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ५ कि़ ८३९ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून एक कोटी ८९ लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी शाखा व्यवस्थापक गणेश बाजीराव तईकर यांनी पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी सोनारासह फसवणूक झालेल्या १७ लोकांवर कलम ४२०, ४१८,४७१,४०८, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मुख्य आरोपी येथील मंगेश साठे असल्याचे समोर आले. त्याच्या शोधात खरांगणा पोलिसांनी दरम्यानचे काळात नागपूर, यवतमाळ येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला होता पण आरोपी गवसला नव्हता. गुरुवारीही पोलीस नागपुरात जावून आले.
दरम्यान शुक्रवारी सकाळी मंगेश साठे हा बँकेत आला असण्याची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेकडे धाव घेतली. याची माहिती मिळताच आरोपीने पोलिसांना वाकुल्या दाखविण्यासाठी मुद्याम पसार होण्याचे नाटक केले. पोलीस वाहनाने पाठलाग केला पण तोपर्यंत आरोपी पसार झाला. यात पोलिसांची नाहक पळापळ झाली. अखेर काही तासाने आरोपी मंगेश साठे हा बँकेत पुन्हा आल्याची खबर मिळताच धावाधाव करून पोलिसांनी बँक गाठली. ठाणेदारांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अटकपूर्व जामीन अर्ज ठाणेदारांना दाखवला व नाट्यावर पडदा पडला.
आरोपी मंगेश साठेने मुद्दाम पळण्याचे नाटक केले. त्याचा कालही नागपुरात शोध घेतला; पण ठावठिकाणा लागला नाही. आज तो बँकेत आल्याची माहिती मिळताच बँकेला घेराव घालत असल्याची कुणकुण लागताच तो चारचाकी वाहनाने पसार झाला व पुन्हा काही तासाने तो बँकेत दाखल झाला. याची माहिती मिळताच परत बँकेत जात त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने न्यायालयाचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज दाखवला.
- निशीकांत रामटेके, ठाणेदार, खरांगणा