आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील 'व्हायरल सच'चा खटाटोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 06:45 PM2018-11-11T18:45:30+5:302018-11-11T18:57:00+5:30
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप हास्यकलाकार सुनील पाल यांनी केला आहे.
वर्धा: सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप हास्यकलाकार सुनील पाल यांनी केला आहे. तसेच याबाबतचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने आरोग्यक्षेत्रात चांगलाच हडकंप माजला. यासंदर्भात रुग्णालयाची बाजू मांडताना रुग्णालय प्रशासनानेही आता व्हिडीओ व्हायरल केल्याने सध्या सोशल मीडियावर आपली सत्य बाजू मांडण्याकरिता व्हायरल सचचा खटाटोप सुरू आहे.
आचार्य विनोबा भावे रुग्णालयात नुकताच आठवडाभरापूर्वी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच ७ नोव्हेंबरच्या रात्री हास्यकलाकार सुनील पाल यांची बहीण शारदा पाल (रा .हिंगणघाट) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी सुनील पाल यांनी अतिदक्षता विभागात जाऊन रुग्णांवर प्रशिक्षित डॉक्टरकडून उपचार होत नाही. परिणामी प्रकृती खालावत असल्याचा आरोप करीत त्यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल केला. तसेच बहिणीवर उपचार होत नसल्याने तिला नागपूरला हलविले, परंतु तिचा मृत्यू झाला. सुनील पाल यांनी या घटनेला रुग्णालयातील डॉक्टर व प्रशासनालाच दोषी ठरविले आहे. या संदर्भात त्यांनी व्हिडीओही सोशल मीडियावर टाकले आहे. परंतु आता रुग्णालयानेही आपली बाजू मांडण्यासाठी व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सध्यातरी व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप होतांना दिसून येत आहे. पण, यात चूक नेमकी कोणाची, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
-------------------------------------------------------------
जशास तसे पण यातील सत्यता काय?
सुनील पाल यांनी थेट रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवत व्हिडीओ व्हायरल केल्याने रुग्णालय प्र्रशासनानेही आपली बाजू मांडण्यासाठी व्हिडीओ व्हायरलचाच आधार घेतला आहे. पण, यातील सत्य काय? असा प्रश्न सा-यांनाच पडला आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून चार व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहे. यामध्ये दोन रुग्णांच्या नातेवाईकांचे असून त्या नातेवाईकांनी रुग्णांना मिळणा-या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. त्यातील एका मातेने येथील डॉक्टरांच्या उपचारामुळेच माझा मुलगा परत मिळाल्याचे सांगून नातेवाईकांनीही डॉक्टरांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. सोबतच पाल यांच्या व्हिडीओमधील डॉ. आदित्य भागवत यांचाही व्हिडीओ व्हायरल झाला असून ते एमडीचे विद्यार्थी आहेत. त्यांनी २०१६ मध्येच एमबीबीएस पूर्ण केल्याचे सांगितले. ते अतिदक्षता विभागातच कार्यरत असून पाल यांच्या गोंधळाने इतर गंभीर रुग्णांना त्याचा त्रास झाला असून एका सेलिब्रिटीचे असे वागणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मेडिसिन विभागाचे प्रोफेसर डॉ. टी. के. कांबळे यांनी शारदा पाल या आठदिवसापासून आजारी होत्या. यवतमाळच्या रुग्णालयात त्यांच्या पोटाचा सिटीस्कॅन केल्यानंतर गंभीर आजार असल्याचे रिपोर्टमध्ये नमुद आहे.त्यानुसार उपचार सुरु करण्यात आले.परंतू त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. याबाबत नातेवाईकांनाही माहिती दिली होती, असे सांगितले आहे. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर महाकाळकर व विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी पाल यांचे आरोप चुकीचे ठरवित रुग्णाला सर्वोतोपरी मदत केली. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णाला नागपूरला हलविण्यासाठीही रुग्णालयाच्या वतीने मदत करण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.