आचार्य विनोबा भावे हे असामान्य प्रतिभेचे धनी होते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 03:45 PM2024-09-11T15:45:40+5:302024-09-11T15:46:28+5:30
दिनविशेष : आज १२९ वी जयंती, महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात दिली नवी दिशा
दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : आचार्य विनोबा भावे असामान्य प्रतिभेचे धनी होते. आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा दुवा असून, महिलांना या क्षेत्रात नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील पहिले सत्याग्रही म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी त्यांची निवड केली होती. आईला संस्कृतमधील गीता समजत नव्हती, म्हणून मराठीत गीताई लिहून आईला समर्पित केली. अशा महान विचारवंत आणि भूदान चळवळीच्या कार्यातून सामान्य गोर गरीबांच्या प्रश्नांमध्ये हात घातला. आचार्य विनोबा भावे यांची ११ सप्टेंबर रोजी १२९ वी जयंती असून, त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला त्यांची ओळख होणे काळाची गरज आहे. आचार्य विनोबा भावे यांना अनेक भाषा अवगत होत्या. गीता समजून घेण्यासाठी ते संस्कृत भाषा शिकले. अध्यात्माचे जेवढे अध्ययन केले, तेवढेच सामाजिक शास्त्रांचे सुद्धा. त्यांचे चिंतन केवळ शाब्दिक नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते कर्मयोगाच्या कठिण साधनेतून तावून सुलाखून निघाल्याने आजही त्यांचे विचार, कार्य आणि साहित्य मानव जातीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हण प्रचलित आहे. संत विनोबा यात बरोबर बसतात. सामान्य कुटुंबातील पण संस्कारमय वातावरणात ते घडले. ते बालपणापासून हुशार होते. आई आध्यात्मिक, तर वडिलांची विज्ञानवादी विचारसरणी असली, तरी विनोबा मात्र सदैव आईचाच पक्ष घेत असे. बालवयातच ब्रम्हचारी राहण्याचा त्यांनी संकल्प केला होता. तारुण्यात शिक्षणासाठी पायपीट केली. संघर्ष करावा लागला. देशातील स्वातंत्र्य चळवळ, राष्ट्रसेवा आणि अध्यात्माची ओढ मात्र कायमच राहिली.
महाराष्ट्र धर्म' पत्रिकेमुळे त्यांची नवीन ओळख लोकांना झाली. वयाच्या १३ व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे भाषांतर वाचले. विद्यालयात शिकताना ज्ञानेश्वरी वाचून काढली, पण ती साहित्य दृष्टीने. विनोबा म्हणतात 'गांधीजींच्या सत्संगात मला गीतेचा अर्थ कळला' गीता हिंदू धर्माचा ग्रंथ असला, तरी तो सांप्रदायिक नाही, असे विनोबांना वाटत होते. विज्ञानातून विकास हा विनाशकारी ठरत आहे. आत्मज्ञानाचा अंकुश आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज जगात जी युद्ध परिस्थिती निर्माण झाली त्यावरून याची प्रचिती येते. विनोबांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती पोचमपल्ली येथील घटनेतून आणि जमिनीची पुढे भूदान ही संकल्पना अस्तित्वात आली. यासाठी तब्बल १३ वर्षे हा यज्ञ अखंड ठेवला. यात ४८ लाख एकर जमीन मिळाली. जवळपास ७० हजार किमीची पदयात्रा यासाठी करावी लागली. पवनार येथे त्यांचा परंधाम आश्रम धाम नदिच्या तिरावर आहे. आश्रमात खोदकाम करीत असतानाच श्रीरामाची मूर्ती मिळाली, तसेच अन्य काही भग्नावस्थेत मूर्ती आढळून आल्याने त्यांची पण प्राणप्रतिष्ठा केली. आश्रमात देशातील विविध भागांतून आलेल्या भगिनी असून, आध्यात्मिक स्तरावर साधनेचा प्रयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. विनोबांच्या प्रेरणेने गीताई मिशनची स्थापना केली. आश्रमाला भेट देणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचे विचार विज्ञान व तंत्रज्ञान युगातही दिशा देण्याचे काम करीत असल्याने आजही मोठ्या संख्येने पर्यटक आणि अभ्यासक आश्रमाला भेट देत असतात.