आरोग्य केंद्रनिर्मिती प्रक्रियेला मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:17 AM2018-07-26T00:17:12+5:302018-07-26T00:18:24+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी २९ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी जागेचा ताबा देण्याकरिता प्रथम आदेश दिला. त्यानुसार १६ जुलैला सदर जागेचा ताबा मिळाला असून जागा अधिग्रहणाऱ्या अंतिम आदेशानंतर तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकाम सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी २९ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी जागेचा ताबा देण्याकरिता प्रथम आदेश दिला. त्यानुसार १६ जुलैला सदर जागेचा ताबा मिळाला असून जागा अधिग्रहणाऱ्या अंतिम आदेशानंतर तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकाम सुरू होणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून प्रस्तावित होते. त्यावर स्थानिक राज्यकर्त्यांचे लक्ष फक्त निवडणूक आल्यावरच पडत होते. सुरूवातीला ग्रामपंचायत तळेगावने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हालचाली सुरू केल्या त्यासाठी नियोजीत केलेली जागा सर्वे नं. ४३/१ हे.आर. ४०.०७ मधील १ हेक्टर बी.एस.एन.एल. टॉवरला लागून असलेली काकडदरा येथील जागा ठरविण्यात आली. परंतु हा विषय बंदच पडला. त्यानंतर पुन्हा तत्कालीन सरपंच सुनिता जोरे त्याचा पाठपुरावा संबंधीत विभागाकडे केला असला तरी पाणी कुठे काय मुरत होते हे कुणालाच माहित नव्हते. त्यानंतर २१ मे २०१७ च्या स्थायी समितीमध्ये जि.प.सदस्य अंकीता होले यांनी हा मुद्दा मांडला तेव्हा ग्रामपंचायत तळेगावने जागेच्या मोजणीकरिता तेवीस हजार रूपये भूमि अभिलेख कार्यालयात भरले नसल्याने जागेची मोजणी अडकली असे त्यांना समजले तेव्हा अंकीता होले यांनी आम्ही लोकवर्गणीतून सदर जागा मोजणीची फी भरतो असे सुचविल्यानंतर स्थायी सभेने अंतीम सूचना ग्रामपंचायतला देवू असे आश्वासन दिले. त्यानंतर १९ मे २०१७ ला जि.प. सदस्य अंकीता होले यांनी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी हे तळेगावला आल्यानंतर त्यांची भेट घेवून जागा मोजणीचा प्रश्न निकाली काढला त्यानंतर ग्रा.प. ने जागा मोजणीची रक्कम भरल्यानंतर जून २०१७ ला जागेची मोजणी करण्यात आली परंतु मागील एकवर्ष प्रकरण थंड अवस्थेतच होते. तेव्हा जि.प. सदस्यांनी वेळावेळी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर आता आरोग्य केंद्रांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. निविदा प्रक्रीया प्रारंभ झाल्यानंतर किमान एक वर्षांचा कालावधीनंतर प्राथमिक आरोग्य केंंंद्राचा लाभ जनतेला मिळू शकेल. या आरोग्य केंद्राचा लाभ तळेगावसह परिसरातील १० गावांना होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.
तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सर्वप्रथम आम्हीच पुढाकार घेतला असून विद्यमान आमदार अमर काळे यांनी वरिष्ठ स्तरावर वेळावेळी याचा पाठपुरावा केला आहे. आणि त्यावेळी ग्रा.पं. तळेगावची सरपंचाकडे असल्याने कागदोपत्री सर्व पाठपुरावा मीच केला आहे.
सुनीता चंद्रशेखर जोरे, माजी सरपंच, तळेगाव (श्या.पंत.)
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या जागा मोजणीची फी भरण्यास ग्रा.पं. टाळाटाळ करीत होती. तेव्हा सर्वप्रथम स्थायी समितीमध्ये हा मुद्दा ठेवून जर ग्रा.प. पैसे भरत नसेल तर लोकवर्गणीतून आम्ही पैसे भरू असे सुचविल्यानंतर ग्रा.प.ला पैसे भरण्याकरिता सांगण्यात आले आणि सर्व विषयात मी पाठपुरावा केला असून त्याचे पुरावे माझ्याजवळ असून फक्त श्रेयासाठी दवाखाना अडविणे व गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळणे म्हणजे राजकारण नव्हे या विषयावर जाहीर चर्चा व्हावी.
अंकीता सचिन होले, जि.प. सदस्य, तळेगाव सर्कल