ट्रॅक्टर मालकावर कारवाई अन् आर्थिक मदतीची याचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:00 AM2021-12-24T05:00:00+5:302021-12-24T05:00:45+5:30
घरातील कर्त्या मुलांचा अपघातात बळी गेल्याने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड, परिवाराचा खर्च आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. कमी परिश्रमात आणि कमी दिवसात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी वाळूचोरीचा गोरखधंदा सुरु केला आहे. यातच त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल लाकडे व ऋतिक वानखेडे या दोघांचा जीव गेल्याने त्यांचे परिवार उघड्यावर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे वाळू चोरीकरिता जात असलेल्या एम.एच.३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन मजुरांचा बळी गेला तर पाच जखमी झाले आहे. त्यामुळे मृतकाच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी त्यांचे घर गाठले. तेव्हा परिवाराच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करा आणि उघड्यावर आलेला संसार सावरण्याकरिता आर्थिक मदत मिळवून द्या, अशी मागणी लावून धरली.
घरातील कर्त्या मुलांचा अपघातात बळी गेल्याने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड, परिवाराचा खर्च आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. कमी परिश्रमात आणि कमी दिवसात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी वाळूचोरीचा गोरखधंदा सुरु केला आहे. यातच त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल लाकडे व ऋतिक वानखेडे या दोघांचा जीव गेल्याने त्यांचे परिवार उघड्यावर आले आहे.
खासदार रामदास तडस यांनी मृतकांच्या परिवाराचे सांत्वन करून प्रत्येकी दहा हजार व जखमी मजुरांपैकी एकाला पाच हजारांची मदत केली. तसेच कायम तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासनही दिले. खासदार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले असता नागरिकांनी त्यांना गराडा घालून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली.
गंभीर जखमीला एका दिवसातच सुटी
- या अपघातात गंभीर जखमी झालेले शिवराज दादाराव डोंगरे व इतर एकाला सेवाग्राम रुग्णालयातून एकाच दिवशी सुटी दिल्यामुळे कुटुंबियांनी रोष व्यक्त केला. डोंगरे यांचा एक पाय ्रफॅक्चर तसेच दुसऱ्या पायाला व डोक्याला गंभीर जखमा असताना त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी पाठविले. या रुग्णाची स्थिती गंभीर असल्याची बाब खा. तडस यांच्या भेटीदरम्यान समोर आली. यासाठी खा. तडस यांनी रुग्णालय प्रशासनाला दोषी ठरवून जाब विचारला. तसेच या रुग्णाची रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवानगी करण्यात आली.