सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:15 PM2023-01-17T18:15:06+5:302023-01-17T18:18:22+5:30

विनापरवानगी वाहतूक, वाहन पोलीस ठाण्यात जप्त

Action taken by tehsildar against sarpanch's sand thief husband; 1 lakh 23 thousand fined | सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड 

सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड 

Next

वर्धा : सेलू तालुक्यातील रेहकी गावातील सरपंचाचे पती तथा माजी सरपंच राजेश झाडे यांनी राजकीय बुरख्याआड ठेकेदारी आणि अवैधरीत्या वाळूचोरीचा गोरखधंदा बऱ्याच दिवसांपासून चालविला आहे. परंतु आता याची माहिती महसूल विभागाला मिळताच महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त केला. तसेच १ लाख २३ हजार १०० रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

येळाकेळी जिल्हा परिषद सर्कलमधील रेहकी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सरपंच रोशनी झाडे यांचे पती राजेश झाडे हे कंत्राटदार असून, आपल्या राजकीय वलयाचा गैरफायदा घेत वाळूचोरीही करीत होते, हे आता कारवाईअंती उघड झाले आहे. राजेश झाडे हे सुरगाव येथील धाम नदीच्या पात्रातून किंवा इतर ठिकाणांहून विनापरवानगी वाळूची चोरी करून ती वाळू शासकीय कामासाठी वापरत असल्याची चर्चा होती.

वाळू चोरीमध्ये त्यांचा हातखंडा असून स्वत:सोबतच अन्य ट्रॅक्टरचालकांनाही ते वाळू चोरीचा मार्ग दाखवित असल्याची भनक सेलूच्या महसूल विभागाला लागली. त्यामुळे महसूल विभागाने त्यांच्यावर पाळत ठेवून शनिवारी रात्री नदीपात्रातून विनापरवानगी वाळूची उचल करुन वाहतूक करीत असलेला एम.एच. ३२, पी. ०५९५ क्रमांकाचा ट्रॅक्टर थांबविला. त्याची तपासणी केली असता त्या ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या वाळू दिसून आली. तो ट्रॅक्टर राजेश झाडे यांचा असल्याचे दिसून आले.

तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी व मंडळ अधिकारी यांनी ट्रक्टर जप्त करुन सेलू पोलीस ठाण्यात उभा केला. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळूसाठा आढळल्याने तहसीलदारांनी २३ हजार १०० रुपयांचा दंड आकारला असून वाहनाबद्दल उपविभागीय अधिकाऱ्यांकडून १ लाखांचा दंड आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राजेश झाडे यांना अवैध वाळू चोरीप्रकरणी १ लाख २३ हजार १०० रुपये दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Action taken by tehsildar against sarpanch's sand thief husband; 1 lakh 23 thousand fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.