आश्रमातील उपक्रम देतात बापूंच्या कार्याची साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:12+5:30
महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. सेवाग्राम आश्रमात असताना चरखा आणि ग्रामोद्योगाला चालणा देण्याचे काम सुरू केले. जे आजही सुरू आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महत्मा गांधी यांनी येथील आश्रमातूनच स्वातंत्र्य चळवलीला दिशा देण्याचे काम केले. २ आॅक्टोबरचे औचित्य साधून येथे अनेकजण नतमस्तक होणार असून आजही आश्रमातील विविध उपक्रम बाजूंच्या कार्याची साक्ष देत असल्याचे बघावयास मिळते.
महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. सेवाग्राम आश्रमात असताना चरखा आणि ग्रामोद्योगाला चालणा देण्याचे काम सुरू केले. जे आजही सुरू आहे. बापूंचा आश्रम नियम, कार्य, उद्योग आदी तत्व व मूल्यांवर आधारीत होता. जो आजही कायम असल्याने इथे येणाऱ्यांना नवी उर्जाच मिळते. शिवाय येथील सुरू असलेले उपक्रम बापूंच्या कार्य व विचारांची साक्ष देतात. गांधीजींनी आपल्या आयुष्यातील साठ वर्षे सार्वजनिक व समाज कार्यासाठी वेचले.
यामुळे बापूंचे विचार व कार्य लोकांसाठी आदर्श व मार्गदर्शक राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळीसाठी सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि रचनात्मक कार्य महत्वाचे ठरून बहुसंख्येने युवक आकर्षिल्या गेल्या. याच मूल्यातून व कार्यातून देशसेवेचा नवा आदर्श आपल्या प्रत्यक्ष जीवन कार्यातून समाजापुढे ठेवला. आजच्या आधुनिक काळात वाढत्या औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानच्या युगातही बापूंच्या जीवन कार्याचे आणि रचनात्मक कार्याची गरज प्रकर्षाने जानवत आहे हे सत्य नाकारता येत नाही. २ आॅक्टोबरला गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार व त्यांच्या कार्याचे स्मरण जगभरात होणार आहे.
१९३६ मध्ये आश्रमाची स्थापना
१९३६ मध्ये सेवाग्रामला आश्रमची स्थापना केली. आपण खेड्यातील जीवन अनुभवायला आणि ग्रामीणोत्थानासाठी आलो आहे असे त्यांनी सांगितले. त्या काळी सेवाग्राम खेड्याचे उत्तम उदाहरण होते. त्यामुळेच गांधीजींनी आपली पसंती दर्शवून राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
अन् घडला इतिहास
आश्रमातील जीवन सामुदायिक होते. पहाटे ते रात्रीपर्यंतचे दैनंदिन कार्यक्रम ते पण नियम व शिस्तीत होतात. येथूनच शिक्षण, उद्योग, सूतकताई ते कापड, स्वावलंबन आणि मूल्यांवरील जीवन पद्धतीचे शिक्षण दिल्याने देशातील विविध भागात कार्यकर्ते जाऊन काम करू लागले. यातूनच रोजगार, विचार आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी बळ मिळायला लागले; पण यासाठी सर्व प्रथम आश्रमातच शेती, गोशाळा, रचनात्मक कार्य, एकादश व्रते, देशनिष्ठा आणि सामुदायिक जीवन पद्धतीचे ज्ञान देण्यात आल्याने अन्य भागात कार्य करण्यासाठी सोईस्कर झाले. यातूनच पुढे स्वातंत्र्याचा इतिहास घडला.