आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई; अख्ख्या कुटुंबाचीच धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:54 PM2023-06-13T13:54:17+5:302023-06-13T13:56:28+5:30

टँकरद्वारे पाणीपुरवठा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रामभरोसे

acute artificial water scarcity; supply of water through tanker | आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई; अख्ख्या कुटुंबाचीच धावाधाव

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई; अख्ख्या कुटुंबाचीच धावाधाव

googlenewsNext

राजेश सोळंकी

आर्वी (वर्धा) : येथील सारंगपुरी जलाशयातून आर्वीकरांना नियमित पाणीपुरवठा केल्या जायचा. मात्र, नगरपालिकेने ही नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित केली. आता जीवन प्राधिकरणकडून शहराला पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठ्यात कधी बिघाड येईल हे सांगता येत नाही. जीवन प्राधिकरणच्या या रामभरोसे कामकाजामुळेच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून भर उन्हात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील वर्धा नदीवरून शहराला पाणीपुरवठा होतो. मागील दोन दिवसांपासून पांडुरंग वाॅर्ड, आसोलेनगर, जिजाऊनगर, देऊलकर लेआउट, संभाजीनगर आदी भागांत पाणीपुरवठा न झाल्याने अख्खे कुटुंबच पाण्यासाठी धडपडत आहे. विशेष म्हणजे नळाला पाणी आले नाही ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता अजय गायधनी यांनाच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जीवन प्राधिकरण कार्यालयात तांत्रिक कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांनी जलकुंभाला पाणी नसल्यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक होते. उपअभियंता अजय गायधनी यांच्यासोबतच अभियंता सूरज येनगडे यांनाही नागरिकांना पाणी मिळाले नसल्याची माहिती नव्हती. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनीही गांभीर्य दाखविले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

पाण्याची समस्या गंभीर, घराबाहेर ड्रमच्या रांगा

जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे शहरात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पालिकेकडून स्टेशन वॉर्ड, संजयनगर, वाल्मीक वॉर्ड आदी भागात टँकरद्वारे दररोज पाच फेऱ्या केल्या जातात. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांच्या घराबाहेर ड्रमच्या रांगा दिसून येतात. सध्या एकच टँकर धावत असून गरज पडल्यास नागरिक फोन करून पाण्याची मागणी करताना दिसून येत आहेत.

शहरात काय आहे व्यवस्था?

शहरात २३ वॉर्ड असून १३ हजार कुटुंबे राहतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेचार हजार नळ जोडण्या आहेत. पाणीपुरवठा करण्याकरिता दोन जलकुंभ असून जनतानगरातील जुना जलकुंभ तोडून नवीन बांधण्यात आला. तर दुसरा जलकुंभ एलआयसी कॉलनीत आहे. या दोन्ही जलकुंभांची क्षमता ९ लाख लिटर आहे. जाजूवाडी येथे आता नव्याने जलकुंभ तयार करण्यात आला असून १५ लाख लिटर साठवणूक क्षमता आहे. काही दिवसांपूर्वीच यातून पाण्याचे वितरण होत आहे.

आर्वी शहरातील काही वाॅर्डांत पाण्याची समस्या असल्याने नगरपंचायतच्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दिवसभरात पाच ट्रिप होतात. जास्तच समस्या निर्माण झाली तर टँकरची त्या परीने व्यवस्था करण्यात येईल.

सुरेंद्र चोचमकर, अभियंता, न.प. आर्वी

देऊरवाडा येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जलकुंभात पाण्याची साठवणूक करता आली नाही. त्यामुळे आर्वी शहरातील जलकुंभात पाणी पोहोचले नसल्याने नळाला पाणी सोडण्यात आले नव्हते. आज जलकुंभ भरण्याचे काम सुरू आहे.

सूरज येंगडे, अभियंता जीवन प्राधिकरण, आर्वी

नळाला पाणी येत नसल्यास तांत्रिक बिघाड किंवा काही अडचणी असेल तर जीवन प्राधिकरणने नागरिकांना सूचना द्यायला हव्यात. जेणेकरून पाण्याचे नियोजन करून ठेवतील. नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने अनेक वॉर्डांतील कुटुंबीयांची मोठी अडचण झाली.

- सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी

Web Title: acute artificial water scarcity; supply of water through tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.