जिल्ह्याकरिता १७०.५२ कोटींची अतिरिक्त मागणी
By Admin | Published: March 6, 2017 01:01 AM2017-03-06T01:01:47+5:302017-03-06T01:01:47+5:30
वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली.
जिल्हा वार्षिक योजना १७-१८ करिता नागपूर येथे राज्यस्तरीय बैठक
वर्धा : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठकीमध्ये सन २०१७-१८ करीता वर्धा जिल्ह्यासाठी १७० कोटी ५२ लक्ष ८४ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली. सदर मागणीबाबत सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री दीपक केसरकर, उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूर्णे तसेच प्रमुख यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत वर्धा जिल्ह्यासाठी ९३ कोटी ३९ लक्ष रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र विविध यंत्रणांकडून १७० कोटी ५२ लक्ष ८४ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत १७० कोटी ५२ लक्ष ८४ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातून आलेली अतिरिक्त निधीची मागणी मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. १ जुलै २०१७ रोजी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच जिल्हास्तरावर रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा बनविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.(प्रतिनिधी)
वाढीव निधी या कामांवर होणार खर्च
अतिरिक्त निधी जलयुक्त शिवार, पशुवैद्यकीय दवाखाने, मोठ्या ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी, सिंचन प्रकल्पातील संपादित जमिनीचा मोबदला, गावांमध्ये पूर संरक्षण भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शौचालय बांधकाम इत्यादी कामांसाठी मागण्यात आला.