आदिवासी विद्यार्थ्यांना सत्राअंतीही शिष्यवृत्तीची प्रतीक्षाच
By Admin | Published: April 12, 2017 12:24 AM2017-04-12T00:24:22+5:302017-04-12T00:24:22+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही.
माहितीचा अधिकार : शासन-प्रशासन सुस्त असल्याचा प्रत्यय
वर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. गत शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील १६,८७६ विद्यार्थ्यांकरिता २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये निधी शिक्षण विभागाकडे आला असताना त्याचे वितरण झाले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
ही माहिती जिल्हा क्षेत्रीय प्रचार कार्यालय, सूचना आणि प्रसार मंत्रालय, भारत सरकार, आसाम आणि अरूणाचल प्रदेश टूर पार्टीचे वर्धा व यवतमाळ येथील माजी मतप्रतिनिधी मारोती उईके व प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरूणकुमार हर्षबोधी यांनी माहिती अधिकारात समोर आणली. यातून निघालेल्या माहितीनुसार विद्यार्थी निधी असतानाही शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे दिसून आले आहे.
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेमध्ये सन २०१५-१६ साठी एकूण विद्यार्थी संख्या १६ हजार ८७६ एवढी आहे. या योजनेचा एकूण निधी २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये एवढा आहे; मात्र हा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे गत ११ महिन्यांपासून पडून होता. मारोती उईके यांनी अधिक माहिती घेण्यासाठी आदिवासी विभाग, आयुक्त कार्यालय, नागपूर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी केलेल्या चौकशीत सदर कार्यालयाने जि.प.वर्धाकडे शिष्यवृत्तीची रक्कम पूर्वीच पाठविली होती; परंतु विद्यार्थ्यांची यादी मात्र पाठविली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता विस्तार शिक्षणाधिकारी यांच्याकडून यादी मिळत नसल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही, असे टाळाटाळीचे उत्तर दिले. विशेष म्हणजे सदर कार्यालयाचे उपकार्यालय वर्धा येथे कार्यरत आहे. येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालयात आले नसल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.
शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा परिषदेकडे पडून
वर्धा : सत्र २०१६-१७ ची शिष्यवृत्ती ही जि.प. वर्धाकडे पडलेली आहे. सदर बाब ही गंभीर असून दोषी कर्मचारी व अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना संघटनेच्यावतीने मारोती उईके यांनी केली. आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृह हेतुपुरस्पर बंद पाडण्याचे षडयंत्र असून आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
आदिवासींना त्यांच्या हक्क व अधिकारापासून जर शासन, प्रशासन दूर ठेवत असेल तर संपूर्ण जिल्ह्यात प्रजासत्ताक तर्फे तीव्र आंदोलन केल्या जाईल, अशी माहिती पत्रकाद्वारे मारोती उईके व हर्षबोधी यांनी दिली.(प्रतिनिधी)
४ हजार ३८४ विद्यार्थी शिष्यृवत्तीपासून वंचित
३० जानेवारीपासून आजपर्यंत प्रजासत्ताक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मारोती उईके यांनी सदर घटनेचा पाठपुरावा केला असता आतापर्यंत एकूण रक्कमेच्या १ कोटी १९ लाख ६१ हजार पाचशे रुपये एवढी शिष्यवृत्ती १० हजार ५३५ विद्यार्थ्यांना मिळाली, पैकी अधिकाऱ्यांच्या रटाळ कामामुळे २१९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ३ लाख ३६ हजार ५०० हे परत गेलेले आहे. एकूण १ हजार ९५७ विद्यार्थ्यांची एकूण रक्कम २८ लाख ८५ हजार ५०० रुपये हे जि.प. कडून वित्त विभागाला सादर करण्यात आली आहे. यामुळे आजही ४ हजार ३८४ विद्यार्थी वंचितच राहिले आहे.