स्मशानभूमिकरिता प्रशासनाला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 09:58 PM2018-01-27T21:58:30+5:302018-01-27T21:58:55+5:30
परिसरातील आर्वी येथे स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी गावातच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला.
आॅनलाईन लोकमत
गिरड :परिसरातील आर्वी येथे स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी गावातच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रशासन व गावकऱ्यांत चर्चा झाल्याने शेवटी गावाबाहेरील ठरवुन दिलेल्या जागेवर तात्पूर्ती स्मशानभूमि देण्यात आल्याने तिथे अंतिम संस्कार करण्यात आला.
काही वर्षांपुर्वी गावलगत असलेल्या शेताजवळील जागेवर येथील नागरिक अंत्यसंस्कार आटोपत होते. कालांतराने शेतमालकाने ही जागा आपल्या ताब्यात घेत येथे शेती करणे सुरू केले. यामुळे या गावात अंत्यसंस्कार करण्याकरिता जागेचा प्रश्न गंभीर झाला होता. याबाबत सबंधित प्रशासनाकडे स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र हा प्रश्न मार्गी लागलाच नाही
२५ जानेवारीला येथील वृद्ध मारोती चट्टे याचा वृद्धापकाळाने मुत्यू झाला. त्यांच्याकडे शेतजमीन नसल्याने त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा हा प्रश्न गावकºयांसमोर निर्माण झाला. याच संधीचा फायदा घेत गावकऱ्यांनी संबधित प्रशासन स्मशानभूमिकरिता जो पर्यंत कायमस्वरुपी जागा उपल्बध करुन देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करायचा नाही, अशी भूमिका घेतली. घटनेची माहिती समुद्रपूर येथील तहसीलदार दीपक करंडे यांना मिळताच ते व नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गिरडचे ठाणेदार महेंद्र ठाकुर व कर्मचाºयांसह आर्वीत दाखल झाले. सरपंच संजय राऊत, तलाठी जांभुळे, मंडळअधिकारी नागापुरे यांच्यासह बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे यानी गावातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढत अंत्यसंस्काराकरिता तात्पुर्ती जागा उपल्बध करून देत गावाच्या बाहेर खाली जागेचे नियोजन केले. तसेच ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रशासनाकडे रितसर मागणी करून कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून देण्याची हमी तहसीलदार दीपक करंडे यांनी दिली. शेवटी प्रशासन व गावकऱ्यांमध्ये चर्चा करुण गावा बाहेरील तात्पुर्ती ठरवून दिलेल्या जागेवर वृध्दाचा अंतिम संस्कार करण्यात आला.