३३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 05:00 AM2021-08-05T05:00:00+5:302021-08-05T05:00:57+5:30
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी, यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस मुख्यालयात बदली दरबार भरविला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या सर्वसाधारण बदल्यांच्या अनुषंगाने पोलीस विभागातील आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पाेलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी, यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस मुख्यालयात बदली दरबार भरविला होता.
यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्यास पसंतीचे ठिकाण विचारण्यात आले होते. यामुळे नेहमीच्या घोडेबाजाराला चांगलाच चाप बसला.
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल ३३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाची बदल्यांची यादी तयार झाली असून येत्या दोन ते तीन दिवसातच बदली झालेले कर्मचारी आपला नवीन पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
८४ कर्मचाऱ्यांना स्थगितीने दिलासा
काही कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती जवळ असल्याने तसेच काही कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारणास्तव, कौटुंबिक कारणास्तव पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे. हे कर्मचारी ज्या ठिकाणी आहेत तेथेच त्यांनी थांबण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिले आहेत. अशा १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल ८४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे.
२० वाहनचालकांचा समावेश
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात असलेल्या वाहनचालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गिरड पोलीस ठाणे, मोटार परिवहन विभाग, हिंगणघाट, वर्धा, खरांगणा, वर्धा, आर्वीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक, पोलीस ठाणे आर्वी, सावंगी, समुद्रपूर, हिंगणघाट, पुलगाव, स्थानिक गुन्हे शाखा आदी पोलीस ठाण्यातील अशा २० चालकांच्याही प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.
विनंती बदल्यांची कार्यवाही सुरू
सध्या प्रशासकीय बदल्या आटोपल्या असून आता विनंती बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी १५ टक्केच बदल्या करण्याचे आदेशित होते. मात्र, आता २५ टक्के बदल्या करण्यात याव्यात, असे आदेश प्राप्त झाल्याने बदली प्रक्रियेला थोडा विलंब होत आहे. मात्र, तरी देखील पसंतीचे पोलीस ठाणे मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दिलासादायक चित्र पाहावयास मिळत आहे.