अकरावीची प्रवेश संख्या अनअपडेट
By admin | Published: June 15, 2017 12:41 AM2017-06-15T00:41:07+5:302017-06-15T00:41:07+5:30
केंद्रीय व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १५ हजार १३१ तर
शिक्षणातील मागासलेपण : पत्राला पाठ
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्रीय व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १५ हजार १३१ तर सीबीएसई बोर्डाचे अडीच ते तीन हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता १८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालयात तेवढ्या तुकड्या आहेत काय, हा प्रश्नच आहे. सध्या याबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ असून २०१३ पासून तुकड्या व महाविद्यालयांची संख्या अपडेटच केली नसल्याचे समोर आले आहे.
निकालानंतर चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक, विद्यार्थी धावपळ करताना दिसतात; पण जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील (माध्यमिक) कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्यांसह पटसंख्येची माहितीच २०१३-१४ पासून अपडेट करण्यात आलेली नाही. ही माहिती अपडेट व्हावी म्हणून ६ जूनच्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली होती; पण केवळ १० टक्केच कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती पाठविल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यातील १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, संयुक्त आदी विभागाचे शिक्षण पूढे घेणार आहे. आपल्या पाल्याला नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक धडपड करताना दिसतो. आवश्यक कागदपत्रांची जुळवा-जुळवही ते करताना दिसतात; पण जि.प. शिक्षण विभागाकडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्या व पटसंख्येची माहितीच अपडेट नाही. जिल्ह्यात सध्या विना अनुदानित ३४, स्वयं अर्थसहायीत १७, अनुदानित ८२ शाळा आहेत. तसेच विना अनुदानित १३ व अनुदानित १२ महाविद्यालये आहे. यात २० टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाची मान्यता घेणे क्रमप्राप्त आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व इतर विभागाच्या किती शाळा, प्रवेश क्षमता किती ही माहिती अद्ययावत व्हावी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र दिले; पण त्यांनीही पत्राला केराची टोपली दाखविली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जि.प.चा शिक्षण विभाग किती मागासला आहे, हे समोर आले.
तुकड्यांबाबत साशंकता
मागील वर्षी १७ हजार ६६० विद्यार्थ्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेतले होते. यंदा या प्रवेश संख्येत घट झाली की वाढ, हे कळण्यास वाव नाही. अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश संख्येची निश्चिती केली नाही. यामुळे २०१७-१८ सत्रातील १८ हजारांवर विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवेश मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. महाविद्यालयांना केलेल्या प्रवेशबंदीचा अकरावी प्रवेशावर परिणाम नसला तरी अनिश्चितता आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजूर तुकड्या तसेच पटसंख्येची माहिती अपडेट व्हावी म्हणून जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात नमूद केलेली माहिती त्वरित पाठविणे क्रमप्राप्त असताना अद्याप बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती पाठविलेली नाही. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात येईल.
- एस.आर. मेश्राम, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. वर्धा.