उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना घेणार दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:00 AM2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:17+5:30
खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण्यात आले आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक खेळाडूला हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने खासदार क्रिडा महात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खं.) येथे धनुर्विद्या स्पर्धेच्या सुरुवातीने या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर समारोप देवळी येथे १ ते ३ एप्रिल या काळावधीत आयोजित विदर्भस्तरीय महिला व पुरुष कुस्तीगीर स्पर्धेने होणार आहे. खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण्यात आले आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. खासदार क्रीडा महोत्सवात कबड्डी, कुस्ती, शंकरपट, क्रिकेट सामने, बास्केट बॉल स्पर्धा, व्हॉलिबॉल स्पर्धा, बॅट मिंटन, हॉकी आदी खेळाचे रंजक सामने होणार असल्याने हा महोत्सव एक प्रकारे खेळप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, प्रशांत बुर्ले, मिलिंद भेंडे, गिरीश कांबळे, पवन परियाल, सुनील साकळे, नितीन जाधव, मनोज झाडे, सुनील तिवारी आदींची उपस्थिती होती.
कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार अकरा जिल्ह्यातील खेळाडू
- देवळी येथे आयोजित विदर्भस्तरीय महिला-पुरुष कुस्तीगीर स्पर्धेत वर्धा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अकरा जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
- आपण स्वत: विदर्भ केसरी असून या मातीतील खेळाला सध्याच्या विज्ञान आणि स्पर्धेच्या युगात पुन्हा नव्या जोमाने भरारी देण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे यावेळी खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले.
तळेगाव (टालाटुले) येथे होणार शंकरपट : मिलिंद भेंडे
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला शंकरपट तळेगाव (टालाटुले) येथे १३ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचा एक भाग असलेल्या या शंकरपटात सुमारे २०० बैलजोड्या सहभागी होण्याची शक्यता आहे. या शंकरपटाच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट होणार असून हा शंकरपट शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे मिलिंद भेंडे यांनी सांगितले.