आराध्य कोंडावार जिल्ह्यातून प्रथम
By admin | Published: June 4, 2017 12:57 AM2017-06-04T00:57:18+5:302017-06-04T00:57:18+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला.
सीबीएसई दहावीचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला. यात हिंगणघाट येथील गिरधरदास मोहता भवन्स विद्यालयाचा आराध्य कोंडावार हा जिल्ह्यातून प्रथम आला. त्याने ९९.२ टक्के गुण घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. त्याला ४९६ गुण मिळाले. तर भुगाव येथील लॉयड्स विद्यानिकेतच्या वेदांत राठी हा ९८ टक्के गुण घेत द्वितीय आला. त्याला ४९० गुण मिळाल्याची माहिती शाळेने दिली.
केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली. यातील चैन्नई विभागाचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारा संचालित जिल्ह्यात एकूण १४ शाळा आहेत. या शाळांतून परीक्षा देणाऱ्या १३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती शाळांतून देण्यात आली. तर पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील केंद्रीय विद्यालयाचा निकाल ९८.०५ टक्के लागला. दहाव्या वर्गाच्या या परीक्षेत सीजीपीए ग्रेड पद्धत असल्याने बऱ्याच शाळांचा त्यांच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढणे कठीण झाल्याचे दिसून आले. यामुळे सायंकाळपर्यंत काही शाळांची निकाल काढण्याची घावपळ सुरूच होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉर्इंट म्हणून या परीक्षेची ओळख आहे. येथूनच विद्यार्थी त्याच्या पुढच्या शैक्षणिक भविष्याचा निर्णय घेत असतो. यामुळे या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष होते. शनिवारी अखेर हा निकाल जाहीर झाला.
या निकालात सर्वच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील या अभ्यासक्रमाच्या सर्वच शाळांत विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए तर अनेक विद्यार्थ्यांनी ९.५ सीजीपीएवर गुण घेतल्याची माहिती शाळांनी दिली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शाळांचा निकाल उत्तम असल्याचे शाळांकडून सांगण्यात आलेल्या माहितीवरुन दिसत आहे.
संकेतस्थळाच्या धिम्या गतीचा फटका
सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल सकाळी जाहीर झाला. याची माहिती पूर्वीच जिल्ह्यातील शाळांना देण्यात आली होती. सर्व निकाल एकाच संकेतस्थळावर असल्याने देशभरातून एकाच वेळी गर्दी करण्यात आली. यामुळे संकेतस्थळाची गती धिमी झाल्याने शाळांना निकाल पाहण्याकरिता विलंब होत असल्याचे दिसून आले. याचा फटका शाळांना बसला.