आठवडी बाजारातूनही बोंडअळी निर्मूलनावर सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:22 PM2018-07-27T22:22:14+5:302018-07-27T22:22:48+5:30
गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, आठवडी बाजाराच्या दिवशी सामान्य शेतकऱ्यांना दवंडी देवून त्यांच्याच बोलीभाषेत बोंडअळी निर्मूलनाबाबतची माहिती पोहचवा असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिले आहे.
या कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संघटना, ग्रामपंचायती यांचीही मदत घ्या,अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद कृषी विभागाने जनजागृती रथ तयार केला आहे. त्या रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचारासाठी रवाना करण्यात आले. जिल्हा परिषदेत मंगळवारी या संदर्भात बैठक घेण्यात आली होती. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, अश्विनी भोपळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कापसे, विशेष घटक योजनेचे कृषी अधिकारी धर्माधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी नियोजन हाती घेतले आहे. बोंडअळी नियंत्रणाकरिता कपाशीची लागवड होताच, पाने, फुले व बोंड लागण्यास सुरूवात होताच बोंडअळीची अंडी इतर बाबीची पाहणी सुरू करून अळींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पातळीवर आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत तपशीलवार माहिती, उपसंचालक कापसे यांनी दिली. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आवश्यक असणारे सर्व फेरोगेन सापळे व किटकनाशके आवश्यक त्या प्रमाणात महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाच्या तालुका वितरकांकडे व कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जन जनजागृती विविध माध्यमातून केली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही विभागाच्या पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यास जबाबदारी सोपवून त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी नियोजनानुसार अहवाल दररोज द्यावा अशी सूचना करण्यात आली.
कपाशीच्या बाजूला भेंडी, अंबाडी लावा
बी.टी. कपाशीच्या सभोवताल नॉन बी.टी. कपाशीच्या आश्रित ओळी लावणे, पिकांसभोवताल कपाशीच्या कुळातील भेंडी, अंबाडी ही सापळा पिके लावणे, कपाशीला पाने, फुले व बोंड लागण्यास सुरूवात होण्यापूर्वीच शेंदरी बोंडअळीची अंडी व छिद्रे यांची नियमित पाहणी करणे, अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळीसारखी दिसणारी फुले तोडून नष्ट करणे, पिकामध्ये हेक्टरी २ फेरोगोन सापळे लावावे.