'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:17 AM2019-08-29T06:17:25+5:302019-08-29T06:21:53+5:30

सिंदीत तक्रार : मामला सेलू पो. स्टेशनकडे

Afcon's subcontractor plowed a five-acre farm | 'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील मुख्य कंत्राटदार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स व उपकंत्राटदार एम. पी. कन्स्ट्रक्शन्स यांनी मुरूम खोदण्यासाठी वर्धा व आर्वी तालुक्यात उच्छाद मांडला आहे.


राज्य सरकारने समृद्धी महामार्गासाठी मुरुमावरची ४०० रुपये प्रति ब्रास रॉयल्टी माफ केली आहे. त्याचा गैरफायदा घेत, या दोन्ही कंपन्या शेतकऱ्यांची परवानगी न घेता बेमूर्वतखोरपणे शेत खोदून मुरूम बाहेर काढत आहेत. अशाप्रकारे सुमारे १०० शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खोदून या कंपन्यांनी शेतकºयांचे शेकडो कोटींचे नुकसान करून ठेवले आहे. विशेष म्हणजे, पोलीस, महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी या बेकायदेशीर उत्खननाकडे डोळेझाक करत असल्याने अ‍ॅफकॉन्स व तिचे १० ते १२ उपकंत्राटदार निर्ढावले आहेत.
याचे उत्कृष्ट उदाहरण गणेशपूर येथील गंगाराम कोदामे मसराम या शेतकºयाचे आहे. कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीच्या सीमेजवळ मसराम यांची सात एकर शेतजमीन आहे. हे ठिकाण गणेशपूरपासून लांब जंगलात असल्याने मसराम व त्यांचे कुटुंबीय या शेताकडे फारसे जात नाहीत. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेऊन अ‍ॅफकॉन्स व एमपी कन्स्ट्रक्शनने मसराम यांच्या शेतातील सातपैकी पाच एकर जमीन खोदून मुरुम चोरून नेला. मे व जून २०१९ असे तब्बल दोन महिने हे उत्खनन सुरू होते, अशी माहिती मसराम यांचे चिरंजीव मधुकर मसराम यांनी ‘लोकमत’ला दिली.


‘‘जुलैच्या शेवटी शेतावर गेलो असता हा धक्कादायक प्रकार कळला. अ‍ॅफकॉन्स व एम.पी. कन्स्ट्रक्शनचे अधिकारी यांची वारंवार भेट घेऊन शेताचे चार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे ते भरून देण्याची विनंती केली पण कुणीही आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही म्हणून २४ आॅगस्ट २०१९ रोजी मी सिंदी पोलिसात तक्रार दाखल केली आहे’’, असे मधुकर मसराम यांनी सांगितले.
सिंदीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले की, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर व एम.पी. कन्स्ट्रक्शन यांचेविरुद्ध सेलू पोलीस स्टेशनमध्ये आधीच कोझी प्रॉपर्टीज व डॉ. राजेश जयस्वाल यांच्या तक्रारी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने मसराम यांची तक्रारही सेलूला पाठवली आहे.


दरम्यान अ‍ॅफकॉन्सचे प्रकल्प प्रमुख बी. के. झा यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
वाचकांना हे आठवतच असेल की, कोझी प्रॉपर्टीजच्या केळझर येथील १००० एकर जमिनीपैकी तब्बल १०३ एकर जमिनीत बेकायदा उत्खनन करून अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने व एम पी कन्स्ट्रक्शनने १०० कोटीचा मुरुम चोरून नेला होता. कोझी प्रॉपर्टीजने याची तक्रार सेलू पोलिसांत केली आहे. अ‍ॅफकॉन्सचे अधिकारी व उपकंत्राटदारावर एफ.आय.आर.सुद्धा दाखल झाला आहे.

Web Title: Afcon's subcontractor plowed a five-acre farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.