अवकाळीचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:14 AM2019-01-26T00:14:19+5:302019-01-26T00:14:58+5:30
जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, केळी, हळद व भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शिवाय शेतात ढिग करून ठेवले तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, केळी, हळद व भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शिवाय शेतात ढिग करून ठेवले तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची बऱ्यापैकी नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
आर्वीसह तालुक्यातील जळगाव, शिरपूर (बोके) वर्धमनेरी, टाकरखेडा, परतोडा, टोणा, देऊरवाडा, राजापूर, सर्कसपूर, वाढोडा, निंबोली (शेंडे), अंबिकापूर, खुबगाव, दहेगाव (मु.), पिंपळखुटा, चिंचोली (डांगे), गुंमगाव, रोहणा, हरदोली, वडगाव (पांडे), नांदोरा, विरूळ (आकाजी) या गावात वादळीवाºयासह मुसळधार पाऊस झाला.
यामुळे तूर, गहू व चना पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शिवाय काही शेतकऱ्यांनी सवंगणी करून शेतातच ढिग करून ठेवलेली तूर आली झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारंजा तालुक्यातील काजळी, राहटी, जोगा, नागाझरी, धानोली, मेटहिरजी, कन्नमवारग्राम, आजनडोह येथे वादळी पावसासह गारपीट झाले. यामुळे शेतातील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. वादळीवाऱ्यामुळे गहू पीक मोडून लोळण घेत असल्याचे दिसून येते.
शिवाय संत्रा, चना व तूर पिकालाही पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सेलू तालुक्यात केळझर, घोराड, आकोलीसह विविध गावांना पावसाचा तडाखा बसला. केळझर येथे गुरुवारी रात्री सुमारे १० वाजता मेघगर्जनेसह झालेल्या पाऊस व गारपीटानंतर आज पहाटे ६ वाजता पुन्हा एकदा पाऊस झाला. या वादळी पावसामुळे अनेकांच्या शेतातील गहू, जमीनदोस्त झाला असून हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतातील कपाशीच्या झाडांवरील बोंडामधील कापूस गळून पडत ओला झाल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. वादळीवाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा रात्री खंडीत झाला होता. तो आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. वायगाव (निपानी), कानगाव, सेलगाव लवणे, समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी संवगणी केलेला हरभरा व तूर शेतातच ढिग करून ठेवले होते. पण, अचानक आलेल्या पावसामुळे ते भिजल्या गेले. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंजी (मो.) येथील शेतकरी बाळा घुमडे यांच्या शेतातील ऊस पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले. अशीच परिस्थिती या भागातील इतर शेतकऱ्यांवर ओढावली आहे. रोहणा परिसरात झालेल्या पावसामुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला. अवकाळी पावसाचा घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. तर ओलिताच्या शेतात झाडाला असलेला कापूस भिजल्याने कपाशी उत्पादकाच्या अडचणीत भर पडली आहे. आष्टी तालुक्यातील माणिकवाडा, तारासावंगा, वडाळा, वर्धपूर या भागात भाजीपाला, संत्रा तर घाडी, साहूर भागात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक गावात झाडे पडल्याने वीज सेवा खंडीत झाली. याचा परिणाम मोबाईल सेवेवर झाला होता. बीएसएनएलची केबल तुटल्याने कार्यालयातील सेवा ठप्प झाली होती. काही ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडाले. नुकसानग्रस्त भागात सर्व्हेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार आशीष वानखेडे यांनी तलाठ्यांना दिले आहे.
बाजारपेठेतील शेतकºयांची तूर भिजली
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेल्या तुरीला अकाली पावसाचा मोठा फटका बसला. मात्र व्यापाºयांची तुर सुरक्षित राहिली. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाल्याचे आरोप मनीष उभाट यांनी केला आहे.