16 महिने 27 दिवसांनंतर वर्धा जिल्हा झाला कोविडमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:00 AM2021-10-10T05:00:00+5:302021-10-10T05:00:08+5:30
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह होते. हे चारही रुग्ण शुक्रवारी कोविडमुक्त झाल्याने जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह कोविडबाधित नाहीत. असे असले तरी आतापर्यंत कोविड-१९ विषाणूने जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३२६ व्यक्तींचा बळी घेतला आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावात १० मे २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तेव्हापासून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह जिल्हा प्रशासनातील महसूल व आरोग्य विभाग कोविड-१९ या जीवघेण्या विषाणूशी लढा देत असतानाच शारदीय नवरात्रोत्सवाच्या द्वितीय दिवशी जिल्हा कोविडमुक्त झाल्याने वर्धेकरांना दिलासाच मिळाला आहे.
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह होते. हे चारही रुग्ण शुक्रवारी कोविडमुक्त झाल्याने जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह कोविडबाधित नाहीत. असे असले तरी आतापर्यंत कोविड-१९ विषाणूने जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३२६ व्यक्तींचा बळी घेतला आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. कोविड संकट मोठे असल्याने प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहण्याची गरज आहे.
४८,०६९ व्यक्तींचा कोविड संसर्गावर विजय
- कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर तसेच आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. असे असले तरी या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून मात करीत प्रत्येक कोविडबाधिताला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात सध्या एकही कोविड ॲक्टिव्ह रुग्ण नसून आतापर्यंत जिल्ह्यातील ४८,०६९ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.
दोनवेळा करण्यात आला ‘सिरो सर्व्हे’
- जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर तसेच कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठण्यापूर्वी असे एकूण दोन वेळा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या सहकार्याने सिरो सर्व्हे करण्यात आला. या दोन्ही सिरो सर्व्हेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला जिल्ह्यातील कोविड संसर्गाबाबत इत्यंभूत माहिती मिळाली आहे.
४.५४ लाख व्यक्तींची झाली कोविड टेस्ट
- जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५४ हजार ३७९ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ४ लाख १ हजार ३५५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
विविध विभागांचे शासकीय अधिकारी-कर्मचारी, वर्धेतील नागरिक, सामाजिक संघटना आदींच्या सामूहिक प्रयत्नाअंती सध्या आपण वर्धा जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविडबाधितांची संख्या शून्य करू शकलो आहोत. असे असले तरी कोविड संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नजीकच्या केंद्रावर जाऊन कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी तसेच कोरोनासंदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी वर्धा.
१६ महिने २७ दिवसानंतर वर्धा जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोविड रुग्णसंख्या शून्य झाली आहे. कोविडमुक्त वर्धा जिल्ह्यासाठी आज खऱ्या अर्थाने सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आहे. असे असले तरी सध्या सण, उत्सवांचे दिवस असून याच दिवसांत गाफील राहिल्यास वर्धा जिल्ह्यावर कोविडची तिसरी लाट ओढावू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा
जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही ॲक्टिव्ह कोविड रुग्ण नसला तरी कोविडच्या तिसऱ्या लोटचे संकट कायम आहे. शिवाय जिल्ह्यात डेंग्यू व व्हायरल फल्यूने डोकेवर काढल्याचे वास्तव आहे. कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा जिल्ह्यात प्रभाव कमी करण्यासह कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी. शिवाय जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
- डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.