तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

By admin | Published: May 12, 2016 02:27 AM2016-05-12T02:27:09+5:302016-05-12T02:27:09+5:30

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली.

After 25 years, the bus services started | तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

Next

वानरचुवा ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली : गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
गिरड : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली. बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बस गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी आंब्याचे तोरण बांधून बस सजविली. मोहगावचे उपसरपंच कैलास नवघरे व पोलीस पाटील महादेव सलाम यांनी बसची पूजा केली.
यावेळी बसचालक आर.जी. ठाकूर, मनोहर बलविर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विजय मसराम, दशरथ दुधकोहळे, वामन दोडके, बालु पसारे, भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे, कवडु कोटमकर, पुरुषोत्तम राऊत, किशोर रंदये उपस्थित होते.
वानरचुवा या गावात २५ वर्षांपूर्वी हिंगणघाट डेपोची ताडोबा बस मोहगाव जंगल मार्गाने चिमूर ताडोबा येथे जात होती. ही बस हिंगणघाट, समुद्रपूर, गिरड, शिवणफळ, मोहगाव, वानरचुवा, मंगरूळ, आमडी, खडसंगी या मार्गाने जात असल्याने ही बस समुद्रपूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण होती. पण कालांतराने ही बस अचानक बंद झाली. त्यामुळे या मार्गावरील वानरचुवा गावातील नागरिकांनी तेव्हापासून बस गावात पाहिलीच नाही. तेव्हापासून या गावातील नागरिक वारंवार ही बस सुरू करावी तसेच मोहगाव मार्गाने पक्का रस्ता बांधावा, अशी मागणी करीत होते. पण खोट्या आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. या २५ वर्षात कित्येक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. बसचे दर्शन वानरचुवा ग्रामस्थांना झालेच नाही.
ही बाब गावकऱ्यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांना सांगत मोहगाव जंगल मार्गे रस्ता व बसची मागणी केली. ग्रामस्थांची मागणी आणि त्यांचा होत असलेली अडचण लक्षात घेत आमदार कुणावार यांनी लवकरच बस सुरू करणार असे आश्वासन ग्रमस्थांना दिले होते. भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली यांनीही हा प्रश्न लावून धरला.
अखेर २५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारी १० मे रोजी गावात बस पोहचली. गावात बस पोहोचल्याचे नागरिकही समाधान व्यक्त करीत होते. याच मागणीप्रमाणे मोहगाव ते वानरचुवा हा रस्ताही लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा वामन दोळके, बालु पसारे, प्रकाश सहारे, बाबा पुनवटकर, गुलाब मसराम, हनुमान येटे, अंबादास मुडरे, सुरेश पुनवटकर, राजु पुनवटकर आदी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. ७आ बसमुळे प्रवाश्यांना होत असलेली अडचण दूर झाली आहे.(वार्ताहर)

Web Title: After 25 years, the bus services started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.