कारवाईनंतरही अतिक्रमण कायम

By admin | Published: September 8, 2016 12:42 AM2016-09-08T00:42:32+5:302016-09-08T00:42:32+5:30

गत महिन्यात १७ आॅगस्ट रोजी नगर पालिकेच्यावतीने शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील टिळक मार्केट

After the action, encroachment continued | कारवाईनंतरही अतिक्रमण कायम

कारवाईनंतरही अतिक्रमण कायम

Next

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे दुर्लक्ष : टिळक मार्केट झाले बकाल
पराग मगर वर्धा
गत महिन्यात १७ आॅगस्ट रोजी नगर पालिकेच्यावतीने शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील टिळक मार्केट परिसरात फळभाज्या विक्रेत्यांवर कारवाई करीत अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विक्रेत्यांना टिळक मार्केटच्या आत जागाही देण्यात आली; पण ही कारवाईच औटघटकेची ठरली. एकही विक्रेता टिळक मार्केटमध्ये दिलेल्या जागेवर गेला नाही. यामुळे या कारवाईला अर्थ काय, हे अतिक्रमण कायमचे हटणार काय, असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
वर्धा शहरातील भाजी व फळ बाजाराची गरज लक्षात घेत १९८५ साली शहराच्या मधोमध गोल बाजारात लोकमान्य टिळक भाजी व फळ मार्केट या नावाने बाजार तयार करण्यात आला. प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था येथे करण्यात आली. मार्केटच्या मधोमध असलेल्या विहिरीलगत लोकमान्य टिळकांचा अर्थकृती पुतळाही बसविण्यात आला. हळूहळू शहर वाढले तसतसे भाजी व फळविक्रेत्यांनी बाहेर रस्त्यांवर अतिक्रमण सुरू केले. काही काळातच मार्केटमध्ये कमी आणि बाहेरच अधिक दुकाने दिसायला लागली. त्यामुळे निर्माण झालेला अतिक्रमणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. पालिका प्रशासन वारंवार अतिक्रामण काढण्याचा प्रयत्न करते; पण दोनच दिवसांत चित्र जैसे थेच होऊन जाते.
पदोपदी भाजी व फळविक्रेत्यांनी जागा बळकावून थाटलेल्या दुकानांमुळे वाहतुकीची वाट लागून अपघात वाढले आहेत. ही बाब ध्यानात घेऊन नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून १७ आॅगस्ट रोजी शहर पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण काढायाला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर टिळक मार्केटच्या आत जागेचे मोजमाप करून रेषा आखून प्रत्येक विक्रेत्याला जागा देऊन उद्यापासून येथेच दुकान लावण्याबाबत सज्जड दम दिला. पण नगराध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित राहत नसल्याने प्रस्थापित असलेले फळ व भाजीविक्रे पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वास्तव आहे. दोन दिवसांचा अल्टिमेटम विक्रेत्यांना देण्यात आला; पण २२ दिवस लोटूनही पालिकेचा अल्टिमेटम संपलेला नाही. एकही विक्रेता मार्केटमध्ये दुकान लावायला गेलेला नाही. ही कार्यवाही पुन्हा होणार काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: After the action, encroachment continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.