पर्यावरणवाद्यांच्या आंदोलनानंतर वृक्ष वाचविण्यासाठी सेवाग्राममध्ये पर्यायाचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:19 PM2020-08-19T14:19:10+5:302020-08-19T14:19:33+5:30
वर्धा-सेवाग्राम मार्गावर वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने आता वृक्ष वाचवून मार्ग तयार करण्यासाठी पर्यायांची शोध घेतला जात आहे. त्यामुळे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामात झाडे वाचविण्यासाठी फेरसर्व्हेक्षण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-सेवाग्राम या मार्गाचे कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी १६८ झाडांपैकी आतापर्यंत ७० झाडे कापण्यात आली. मात्र, वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने आता वृक्ष वाचवून मार्ग तयार करण्यासाठी पर्यायांची शोध घेतला जात आहे. त्यामुळे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामात झाडे वाचविण्यासाठी फेरसर्व्हेक्षण सुरू केले आहे.
दत्तपूर ते नालवाडी व आरती चौक ते गांधी चौक ते सेवाग्राम या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे हायब्रीड अंन्युटी मोड अंतर्गत कॉक्रीट चौपदरीकरणाचे काम मंजूर असून प्रगतीत आहे. या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे दरम्यान सुमारे २५०० झाडे आहेत. मात्र ही झाडे वाचविण्यात आली असून रस्त्याच्या मध्ये येणारी १७० झाडे काढणे आवश्यक आहे. यासाठी वनविभाग, सेवाग्राम आणि नालवाडी ग्रामपंचायत तसेच नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.
सदर झाडे काढत असताना पर्यावरणाच्या मुद्यावरून सेवाग्राम मधील काही नागरिकांनी चिपको आंदोलन करीत झाडे काढण्यास तीव्र आक्षेप नोंदविला यासंदर्भात कार्यकारी अभियंता गजानन टाके यांनी नागरिकांशी दोनदा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रेल्वे उड्डाणपूल ते डॉक्टर्स कॉलनी दरम्यान पूर्णपणे पेव्हिंग ब्लॉक लावून काही झाडे वाचविता येऊ शकतात का याबाबत सर्वेक्षण करण्याचे ठरले. सद्यस्थितीत झाडे काढण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून सर्वेक्षणानंतर जितकी झाडे वाचवता येतील तेवढी वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे अभियंता टाके यांनी नागरिकांना दिले आहे.
रस्त्याच्या रुंदीची मोजणी केली तेव्हा दुतर्फा असलेल्या झाडांमधले अंतर ११ मीटर असल्याचे दिसले. हे अंतर १० मीटर (३३ फूट) रुंद रस्ता बांधण्यास पुरेसे आहे. इतक्या रुंदीच्या रस्त्यातून तीन कार किंवा दोन बस-ट्रक सहज जाऊ शकतात. रस्त्याच्या मधोमध कोणतेही झाड येत नाही, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. वर्ध्यासारखी मोकळी पसरलेली शहरं फार कमी असतील. बंगलोर, पुणे, दिल्ली सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरातही जुन्या वृक्षांना, झाडांना जपत पक्क्या रस्त्यांची बांधणी केली गेली आहे. वर्ध्यासारख्या शहरातही असे नीटनेटके नियोजन व्हावे व ते सहज शक्य आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल का? जगभरातील अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झाले की रस्ता रुंदीकरणाने अपघातांचे प्रमाण कमी होत नाही, उलट वाढलेलेच दिसते, असा दावा वृक्ष बचाव समितीने केला आहे.
सेवाग्राम मार्ग शांतीपथ हवा
गांधीजींच्या आश्रमाकडे जाणाऱ्या या रस्त्याला 'शांतिपथ' बनवित मर्यादित वेगाने वाहतूक होणे अपेक्षित आहे. आजूबाजूच्या हिरवाईमुळे रस्त्यावरील रहदारीपासून रहिवासी आणि विद्यार्थ्यांचे रक्षण होईल. एकही झाड न तोडता शक्य तितका रुंद आणि पक्का रस्ता बांधावा, रस्ता बांधणीसाठी मशीनने केलेल्या खोदकामात मोठ्या वृक्षांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत. त्या झाडांना जगवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, सदर रस्ता दोन किंवा तीन पदरी ठेवल्यास भविष्यकालीन वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि मोठमोठी झाडेही वाचतील अशी मागणी वृक्ष बचाव समितीने व्यक्त केली आहे.