विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर विद्यापीठाची चमू महाविद्यालयात
By admin | Published: April 8, 2017 12:29 AM2017-04-08T00:29:25+5:302017-04-08T00:29:25+5:30
येथील श्रीमती अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात दाखल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्यावतीने
सुविधांचा मुद्दा : अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयातील प्रकार
वर्धा : येथील श्रीमती अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात दाखल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्यावतीने साध्या प्राथमिक सुविधांसह योग्य शैक्षणिक अर्हतेचा प्राचार्य नसल्याची तक्रार थेट डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे केली. याची दखल घेत विद्यापीठाची चमु शुक्रवारी महाविद्यालयात दाखल झाली. या चमुने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचेही म्हणणे ऐकून घेत काही महत्त्वाच्या सूचना महाविद्यालयाला दिल्या. यावेळी चर्चेअंती योग्य शैक्षणिक अर्हता असलेला प्राचार्य नेमण्याच्या विशेष सूचना चमूने महाविद्यालयाला केल्या.
या महाविद्यालयात बीएससी (कृषी) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे एकूण १८० विद्यार्थी आहे. महाविद्यालय सुरू झाले त्या काळापासूनच येथे सुविधांची बोंब आहे. शिवाय येथे शैक्षणिक वातावरणही नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे केली. याची दखल घेत विद्यापीठातील चमु शुक्रवारी महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांत शाब्दिक चकमक उडाली. या सर्व तणावाच्या वातावरणात तब्बल दोन तास चर्चा झाली. या चर्चेअंती विद्यापीठाच्या चमुने महाविद्यालयाला प्राचार्याच्या नेमणुकीसह इतर बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. शिवाय विद्यापीठाच्या चमुने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत निर्णय घेतल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची तक्रार मिळताच चौकशीकरिता महाविद्यालयात आलो. तक्रारीत असलेल्या मुद्यांवर विद्यार्थी, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचारी व मॅनेजमेंटसोबत चर्चा केली. यात प्राचार्य नेमणुकीच्या सूचना महाविद्यालय व्यवस्थापनाला केल्या आहेत. त्यावर त्यांनी सहमतीही दर्शविली आहे. विद्यापीठाचा निरीक्षकाची नेमणूक महाविद्यालयावर लवकरच करण्यात येईल.
- दामोधर तामगाडगे, निम्न शिक्षण प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.