आठ कोटींच्या योजनेनंतरही तहान कायम
By admin | Published: May 24, 2015 02:24 AM2015-05-24T02:24:28+5:302015-05-24T02:27:40+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला.
योगेश वरभे अल्लीपूर
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला. याला चार वर्षांचा कालावधी होत असला तरी योजनेतील पाण्याचा एकही थेंब गावकऱ्यांच्या नळाला पोहोचला नाही. यामुळे पाणी टंचाईचे चटके या गावातील नागरिकांना सोसावे लागत आहे. या योजनेत वर्धा नदीच्या कात्री येथील डोहातून पाणी घेण्याचा निर्णय झाला होता. याकरिता टाकण्यात येणार असलेली पाईप लाईन व शुद्धीकरणाकरिता उभारण्यात येणार असलेल्या फिल्टर प्लॉन्टच्या टाकीचे काम अद्यापही अपूर्णच आहे.
मनसावळी, भगवा, काचनगाव, पवनी, अलमडोह, अल्लीपूर, मार्वी ही सात गावे प्राधिकरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्यासाठी गावात रोज तंटे होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या २ लाख २६ हजार लीटर क्षमतेच्या टाकीच्या जोरावर गावकऱ्यांची तहाण भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टाकीत यशोदा नदीवरून पाणी पुरवठा होत आहे. यात ऐन पाणी टंचाईच्या तोंडावर कोल्हापूरी बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने यशोदा नदी कोरडी झाली आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना शेवटचे आचके घेत आहे.
गावात १४ सार्वजनिक विहिरी असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात क्षार आहे. यातील पाणी नागरिकांकडून वापराकरिता घेण्यात येत आहे; मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. महिलांचे पिण्याच्या पाण्याकरिता हाल होत आहे. पवनी येथील विहीर, यशोदा नदी, जीवन प्राधिकरण योजना आदी पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आता धोक्यात आले आहे. यशोदा नदीचे पाणी कोल्हापूरी बंधाऱ्यातून सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. प्राधिकरणचे पाणी गावात कात्री येथून येत आहे. यात जागोजागी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज, भारनियमन व अपूर्ण काम यामुळे गत महिन्यापासून गावात तीव्र पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
विठ्ठल मंदिर भवानी वॉर्ड, गाळोबा वॉर्ड, सदानंद वॉर्डातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. ग्रा.पं. प्रशासनाला पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महिला व नागरिकांनी ग्रा.पं. वर धडक दिली. यावेळी नागरिकांनी पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी लावून धरली होती.