स्वातंत्र्यानंतरही गोहदा ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा
By admin | Published: May 27, 2015 01:58 AM2015-05-27T01:58:43+5:302015-05-27T01:58:43+5:30
हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही.
बोरधरण : हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही. स्वातंत्र्यानंतरही गावातील नागरिक या सुविधेपासून वंचित आहे. वारंवार मागणी करूनही उपयोग होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यशीलतेवर संताप व्यक्त केल्या जात आहे. येथील ग्रामस्थांची प्रवासाकरिता होणारी पायपीट आजतागायत कायम आहे.
गोहदावासियांची बसफेरीची प्रतीक्षाच कायम असली तरी प्रशासकीय स्तरावर अद्याप कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. शिवाय लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करूनही बस आजवर गावात आली नसल्याने गावकरी संताप व्यक्त करतात. निवडणूक काळात मत मागण्यासाठी आलेले उमेदवार बसफेरी चालु करून देऊ, असे आश्वासन देतात. मात्र निवडणूक आटोपल्यावर याचा विसर पडतो. असा आजवरचा गोहदावासियांचा अनुभव आहे.
गोहदा गावाची लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. येथील ग्रामस्थांना कामाकरिता तसेच आठवडी बाजाराकरिता हिंगणी येथे जावे लागते. मात्र बस नसल्याने पायी किंवा खासगी वाहनाने जावे लागते. आठवडी बाजाराच्या दिवशी खासगी वाहने सुरू असतात. परंतु अन्य दिवस सायकल किंवा खासगी वाहनांखेरीज पर्याय नसतो.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर पायपीट करावी लागते. यात विद्यार्थ्यांची कसरतच होते. हिंगणी येथे इयत्ता ५ ते १० वी पर्यंत शाळा आहे. शिक्षणासाठी तेथेच जावे लागते. अशात शाळेला उशीर झाल्यास शिक्षक दंड करतात. घरी जाताना काळोख पडण्यापूर्वी जावे लागते. पायपीट करण्यातच विद्यार्थी थकतात. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालक सांगतात. लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे लक्ष देत गावकऱ्यांची समस्या त्वरीत सोडवावी अशी मागणी होत आहे. परिवहन विभागाने दखल घेण्याची मागणी आहे.