पदव्युत्तर शिक्षणानंतर थाटला रस्त्याच्या कडेला व्यवसाय
By admin | Published: March 29, 2015 02:03 AM2015-03-29T02:03:38+5:302015-03-29T02:03:38+5:30
शिक्षण एमए, एमएसडब्ल्यू, पेशा व्यवसाय अन् तोही रस्त्याच्या कडेला चार चाकी बंडीवर फास्टफुड विक्री.
श्रेया केने वर्धा
शिक्षण एमए, एमएसडब्ल्यू, पेशा व्यवसाय अन् तोही रस्त्याच्या कडेला चार चाकी बंडीवर फास्टफुड विक्री. प्रथमदर्शनी वाचताना या दोन्ही वाक्यात विरोधाभास वाटत असला तरी ही सत्यकथा आहे, एका युवकाची! रस्त्याच्या कडेला चारचाकी बंडी उभी करून खाद्यपदार्थांची विक्री करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारा हा युवक म्हणजे किरण मोकदम होय़
शिक्षण डबल डिग्रीपर्यंत झाले असतानाही नोकरी मिळत नव्हती. नोकरी लागण्यासाठी द्यावे लागणारे पूरेसे भांडवल जवळ नसल्याने त्याने सरळ व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले़ घरची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने भांडवलाची तजविज करणे सहज शक्य नव्हतेच. मित्रांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून एक चारचाकी घेऊन बॅचलर रोडवरील शाळेच्या परिसरात त्याने खाद्यपदार्थ विक्री सुरू केली. आपले शिक्षण पदव्युत्तर असताना रस्त्याच्या कडेला विक्री करण्याबाबत कोणतीच बुज त्याने राखली नाही. नोकरीच्या शोधात वेळ घालविण्यापेक्षा अंगभूत कौशल्याचा वापर करून स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यास मिळकत होते. फक्त थोडी मेहनत, जीद्द आणि संयम राखण्याची गरज आहे, हाच निर्धार करून किरणने फास्टफुड विक्रीचा निर्णय घेतला. रोज सायंकाळी येथे युवा वर्गासह खवय्यांची गर्दी होते. उच्च शिक्षणानंतर नोकरी न मिळाल्याने वैफल्यग्रस्त युवकांकरिता नावाप्रमाणेचे तो खरोखरच आशेचा ‘किरण’ ठरला आहे.
सध्याच्या काळात फास्टफुडची चलती आहे़ महानगरीय जीवनशैलीचा भाग असलेल्या या पदार्थांचे लोण सर्वदूर पसरले आहे़ विशेषकरुन युवा वर्गात याला असलेली पसंती पाहता याच पदार्थांच्या विक्रीकरिता निवड केली. यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किरणने एका उपाहारगृहात काम करून तेथील पद्धत जाणून घेतली. यात त्यांच्या सुशिक्षित पत्नीचीही साथ मिळत असल्याने आता दिवसाला त्यांना ५०० ते ८०० रुपयांची मिळकत होते.
प्राणिमात्रावर निस्सिम प्रेम असलेले किरण हे नित्याने भटक्या कुत्र्यांकरिता अन्नपदार्थ गोळा करून त्यांना खायला घालतात.