नांदेड, संभाजीनगर नंतर गुजरात राज्यातील दोघे जेरबंद
By महेश सायखेडे | Published: August 28, 2023 05:26 PM2023-08-28T17:26:33+5:302023-08-28T17:27:32+5:30
सावंगी (मेघे) च्या महिला लेक्चररची आर्थिक फसवणूक प्रकरण
वर्धा : सावंगी (मेघे) येथील महिला लेक्चररची आर्थिक फसवणूक प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी आहेत. या दोन्ही आरोपींची ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. अजय दत्तू पाटील व पृथ्वीश शिवाभाई मावाणी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंगी (मेघे) भागातील रावत रेसीडेन्सी भागातील रहिवासी चित्रीका सुभदर्शनी सुधांशू पानीग्रही या व्यवसायाने लेक्चरर आहेत. त्यांना आरोपीने फोन करून आपण फेडेक्स कंपनीचा कर्मचारी असून पार्सल मध्ये दोन किलो कपडा, पाच पासपोर्ट, सहा क्रेडीट कार्ड व १४० ग्रॅम एम. डी. हे अंमली पदार्थ पकडले असल्याचे सांगून त्याकरिता १६,२५० रूपयांचे पेमेंन्ट त्यांचे आय. डी. वरून पाठविले असे सांगितले.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मुंबई पोलीस सायबर क्राईम या नावाने स्काईप वरून कॉल करून भीती दाखवून तक्रारकर्त्याकडून तब्बल २ लाख ४७ हजार ७७६ रुपयांची रक्कम उकळून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपासाला गती दिली. सुरूवातीला आरोपी अंबादास जनार्धन कांबळे, रा. रा. नांदेड आणि अनिल संभाजी पाटील, रा. संभाजीनगर यांना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तर इत्यंभूत माहिती हाती लागल्यावर वर्धा पोलिसांच्या पथकाने गुजरात राज्यातील सुरत गाठून अजय दत्तू पाटील व पृथ्वीश शिवाभाई मावाणी याला अटक केली.
या दोन्ही आरोपींकडून पाच मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे, वैभव कट्टोजवार, नीलेश तेलरांधे, रणजित जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, लेखा राठोड, प्रतिक वांदीले यांनी केली.