अकोल्यानंतर निजामपुरात बोंडअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:35 PM2018-07-28T23:35:42+5:302018-07-28T23:36:10+5:30
गतवर्षी गुलाबी बोंडअळीने विदर्भातील कापूस उत्पादकांनाजबर फटका दिल्यानंतर यावर्षी पुन्हा गुलाबी बोंडअळीचा प्रकोप दिसून येत आहे. आकोला नंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षी गुलाबी बोंडअळीने विदर्भातील कापूस उत्पादकांनाजबर फटका दिल्यानंतर यावर्षी पुन्हा गुलाबी बोंडअळीचा प्रकोप दिसून येत आहे. आकोला नंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. दक्षतेचा उपाय म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतात जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना काळजी घेण्याबाबत हायअलर्ट जारी केला आहे.
निजामपूर येथील सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात २७ जुलै रोजी गुलाबी बोंडअळीचा किरकोळ प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यांच्या शेतात तुलसी ४ वाहिणी नावाच्या वाणाची पेरणी ७ जुन रोजी चार एकरात करण्यात आली. येथे प्रथम पाहणी केली असता १ चौरस मीटर क्षेत्रात १२ अळ्या दिसून आल्या. सदर पाहणी करण्यासाठी शेताला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ डॉ. उंबरकर, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. नाईक व कृषी विभागाचे अधिकारी स्वत: गेले होते. ही गुलाबी बोंडअळीच असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच येथील सरपंच व इतर शेकºयांना एकत्रित बोलावून त्यांना निमअर्क व रासायनिक फवारणी बाबत माहिती देण्यात आली. तसेच फेरोमोन ट्रॅप्स लावण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सदर शेतकऱ्यास पाहणी झाल्यावर क्विनॉलफॉस २५ ईसी. २० मि.ली. किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के, २० ग्रॅम १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्याबाबत सूचना देण्यात आली. यापैकी कोणत्याही एकाच औषधाची फवारणी करण्याबाबत सुचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मानकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अशी घ्यावी दक्षता
कामगंध सापळ्याचे पाच सुटे भाग असतात. या सुट्या भागामध्ये चाडी, गोल रिंग, पॉलिथिन पिशवी, वरचे झाकण आणि लूर (रबरी कॅप्सूल). या सर्व भागांना व्यवस्थित लावुन घ्यावे.
कामगंध सापळे लावतांना पॉलिथिन पिशवी मोकळी करून चाडी आणि रिंग मध्ये व्यवस्थित बसवून घ्यावे. वरच्या झाकानाला आतील बाजूने मधोमध लूर (रबरी कॅप्सूल) फिट्ट बसवून घ्यावे.
पॉलिथिन पिशवी खालच्या बाजूने व्यवस्थित बंधून घ्यावे. जेणे करून पतंग उडून जाणार नाहीत. पावसाचे पाणी सापळ्या मध्ये साचणार नाही याची काळजी घ्यावी.
कामगंध सापळा लावण्यासाठी सरळ काठी वापरावी. सापळा सरळ काठीला व्यवस्थित दोरीच्या साहाय्याने बांधून घ्यावा. एका हेक्टर मध्ये सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे लावावेत.
मास ट्रॅपिंगसाठी हेक्टरी २० सापळे लावावेत. झिगझॅग पद्धतीने कामगंध सापळे शेतामध्ये लावावेत. कपाशीच्या उंची पेक्षा एक फूट उंचीवर कामगंध सापळे लावावेत.
३० दिवसांनी कामगंध सापळ्यातील लुर (कॅपसुल) बदलवून घ्यावे. सापळ्यामध्ये पतंग आढळल्यास ते बंद रुमाल वा पिशवीमध्ये उडु न देता काढावे.
तसेच मारुन नष्ट करावे. हे पतंग सापळ्यात मारल्यास किंवा मरु दिल्यास त्याच्या दुर्गंधीने सापळ्यातील लुरचा गंध मारल्या जाईल व सापळे निरुपयोगी होतील.