पर्यायी जागा दिल्यानंतरच अतिक्रमण काढावे

By admin | Published: August 21, 2016 12:44 AM2016-08-21T00:44:06+5:302016-08-21T00:44:06+5:30

शहरातील टिळक चौक, गोलबाजार, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तसेच कपडा लाईन परिसरात मुख्य रस्त्यांवर फळ,

After providing alternative space, encroachment should be removed | पर्यायी जागा दिल्यानंतरच अतिक्रमण काढावे

पर्यायी जागा दिल्यानंतरच अतिक्रमण काढावे

Next

किरकोळ हॉकर्स फळ व भाजी विक्रेत्यांची मागणी : नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : शहरातील टिळक चौक, गोलबाजार, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तसेच कपडा लाईन परिसरात मुख्य रस्त्यांवर फळ, भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. पालिका प्रशासन टॅक्स घेते; पण जागा देत नसल्याने किरकोळ विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला दुकाने लावावी लागतात. यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नंतरच अतिक्रमण हटवावे, अशी मागणी किरकोळ हॉकर्स फळ आणि भाजी विक्रेत्यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिवाय ही कार्यवाही करीत असताना होणाऱ्या चर्चेत विनोद वानखेडे, कांचन खेडकर, शेख इमाम कुरेशी, कमलेश छकोले व पंढरी खेकडे हे पाच सदस्य ठेवावेत. अन्यथा कुठलाही निर्णय मान्य केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील रहदारीच्या रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे सामान्यांना त्रास होत आहे. यातून त्यांची सुटका व्हावी या उद्देशाने काही एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी व प्रमुख व्यावसायिकांची ६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सराफ लाईन व कपडा लाईन येथील किरकोळ रस्त्यांवरील दुकानदारांना टिळक चौक गोलबाजारमध्ये आतील भागात जागा देण्याचे ठरले. दुकान मालकांनी स्वत:ची चारचाकी वाहने दुकानासमोर न ठेवता महादेवपुरा येथील बुटीवाडा जवळील रस्त्याच्या बाजूला ठेवावी, अशी सर्वांनुमते चर्चा झाली; पण एक आठवड्यापासून टिळक चौकात ६० वर्षापासून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण समजून नगर परिषदेने ते हटविले. वास्तविक, त्या सर्व दुकानदारांना प्रथम गोलबाजारात आतील भागात दुकानासाठी जागा देणे, शौचालय, स्वच्छतागृह तयार करणे, पाणी, विद्युत आदी व्यवस्था करणे गरजेचे होते; पण तसे केले नाही.
केवळ किरकोळ दुकानदारांचे अतिक्रमण काढून त्यांना बेरोजगार करण्याचा प्रताप पालिकेने केला. यामुळे प्रथम दुकानांची व्यवस्था करावी, नंतरच अतिक्रमण काढावे, दुकान मालकांनी चारचाकी वाहने दुकानासमोर रस्त्यावर न ठेवता अन्यत्र ठेवण्यास सांगावे, अशी मागणीही किरकोळ हॉकर्स फळ आणि भाज्या विक्रेत्यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)

किरकोळ भाजी व फळ विक्रेते गोलबाजारात बसण्यास तयार
गोलबाजार तसेच टिळक चौक, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तथा कपडा लाईन परिसरातील सर्व किरकोळ भाजी विक्रेते गोलबाजारातील आतील भागात व्यवसाय करण्यास तयार आहेत; पण सर्वांना समान न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही दुकानदार आतमध्ये आणि पुन्हा काही दुकानदार रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणार असतील तर परिस्थिती जैसे थे होते. असे होत असेल तर दुकाने आहे तेथेच ठेवून वाहने लावू द्यावीत, जागेची सीमा कमी करून पट्टे आखून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

Web Title: After providing alternative space, encroachment should be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.