दडीनंतरच्या पाऊसधारांनी शेतकरी सुखावला

By Admin | Published: June 27, 2017 01:11 AM2017-06-27T01:11:25+5:302017-06-27T01:11:25+5:30

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

After the rainy season the farmers have dried up | दडीनंतरच्या पाऊसधारांनी शेतकरी सुखावला

दडीनंतरच्या पाऊसधारांनी शेतकरी सुखावला

googlenewsNext

सर्वदूर पाऊस : पेरण्या साधणार; शेतीकामांना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. गत काही दिवसांपासून आकाशात ढग दाटत होत; पण तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. दडीनंतर अखेर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पाऊसधारा शेतात अंकुरलेल्या पिकांकरिता नवसंजीवनीवच घेवून आल्याने जिल्ह्यात शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस येईल या आशेने जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादकांनी मान्सूनपूर्व पेरणी केली होती. प्रारंभी आलेल्या पावसामुळे शेतात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे बियाणे अंकुरले. अशातच उगविलेल्या अंकुरांना पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. यात अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणी पावसानंतरच करावी असे म्हणत पावसाची प्रतीक्षा संपल्याचे आजच्या पावसावरून दिसून आले.
पावसाच्या दडीने जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीला ‘ब्रेक’ दिला. त्यांनी बियाण्यांची जुळवाजुळव करून ठेवली आहे. त्यांना केवळ पावसाची प्रतीक्षा होती. त्यांची प्रतीक्षा आजच्या पावसाने ती संपली आहे. आज आलेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर आला आहे. यामुळे उद्यापासून पेरणीच्या कामांना गती येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात १ हजार ५१७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे सांगण्यात आले; मात्र वास्तविकतेत पेरणीचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात १ हजार ५१७ हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. जर पावसाची दडी अशीच राहिली तर दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यात सोमवारी दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. आज आलेला पाऊस शेतात अंकुरलेल्या बियाण्यांकरिता संजीवनीच ठरणार आहे. या पावसामुळे पिके तग धरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

सोयाबीनच्या पेरणीला येणार जोर
पेरणीकरिता योग्य पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरा करण्याची हिंम्मत दर्शविली नाही. यामुळे स्प्रिंकलर आणि ठिंबक सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. सोमवारपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून सर्वदूर पेरणीला प्रारंभ होणार असल्याचे संकेत आहेत. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून रखडलेल्या सोयाबीनच्या पेरणीला उद्या मंगळवारपासून जोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: After the rainy season the farmers have dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.