सेवानिवृत्तीनंतरही ‘ते’ देतात इंग्रजीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:28 PM2017-12-20T23:28:09+5:302017-12-20T23:28:34+5:30
ज्ञानदानाने स्वत:च्या ज्ञानातही भर पडते. शिवाय गरजू, गरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळाही लागेल, या उद्देशाने एक व्यासंगी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : ज्ञानदानाने स्वत:च्या ज्ञानातही भर पडते. शिवाय गरजू, गरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळाही लागेल, या उद्देशाने एक व्यासंगी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य इतरांना पे्ररणादायी असेच आहे.
सोहमनाथ विद्या मंदिर उमरी शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या गोपाळ घाडगे यांनी निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मूळ गाव लिंगा (मांडवी) येथे जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी ते विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेत नाही. इंग्रजीमध्ये प्राविण्य असलेले घाडगे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग गावातील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून नि:शुल्क इंग्रजी शिकविणे सुरू केले. या शिकवणी वर्गात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतची गावातील सर्व मुले-मुली उपस्थित राहतात. त्यांच्या इंग्रजी विषयाच्या शिकवणीमुळे विद्यार्थ्यांत इंग्रजी विषयाची भीती, न्यूनगंड पूर्णत: नष्ट झाला आहे. असे म्हणतात की, निवृत्तीपर्यंतच आपले शिकविण्याचे काम आहे; पण घाडगे यांच्यासारखे ध्येयवेडे शिक्षणप्रेमी सामाजिक बांधिलकी जपतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत असलेली तळमळ कुरवाळत त्यांनी मार्गदर्शन करणे सुरू ठेवले आहे. त्यांचा हा व्यासंग कौतुकास पात्र ठरतोय.
शाळांना देतात भेटी
घाडगे हे स्वत: शाळांना भेटी देत इंग्रजी विषयाचे वर्ग घेतात. तेव्हा वर्गातील विद्यार्थीही मंत्रमुग्ध होतात. आजपर्यंत त्यांच्या हातून बरेच विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विद्याविभूषित झालेत. आजच्या शिक्षणाच्या खासगीकरणाच्या युगात घाडगे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज आहे.