समाधानकारक पावसानंतर शेतीच्या कामाला वेग
By admin | Published: June 29, 2017 12:28 AM2017-06-29T00:28:06+5:302017-06-29T00:28:06+5:30
जिल्ह्यात गत दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामाला वेग आला आहे.
शेतकरी सुखावला : २३ टक्के पेरण्या आटोपल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामाला वेग आला आहे. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १३६.२५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. २३ जूनपर्यंत जिल्ह्यात २३ टक्के पेरण्या आटोपल्या असून पावसानंतर सोयाबीन, कापूस लागवडीला वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी शेती कामाला लागला आहे.
२८ जूनपर्यंत गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात सरासरी १३. ४७ टक्के पाऊस झाला होता. यंदा यात वाढ झाली असून सरसरी १४.८० टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गत वर्षी १२३.९९ मि.मी. तर यंदा १३६.२५ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. झाला आहे.
जिल्ह्यात आज काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रखडलेली सोयाबीनची पेरणी जोरात सुरू झाली आहे. येत्या दिवसात येणाऱ्या पावसाचा पिकांना लाभ व्हावा याकरिता शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहायाने पेरणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.