छाननीत ३३ नामांकन बाद

By admin | Published: February 3, 2017 01:50 AM2017-02-03T01:50:03+5:302017-02-03T01:50:03+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल

After scrutiny 33 nominations | छाननीत ३३ नामांकन बाद

छाननीत ३३ नामांकन बाद

Next

जिल्हा परिषद व पंचायत समितीतील एकूण ९६३ नामांकन वैध
वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस बुधवार (१ फेब्रुवारी) होता. अंतिम दिवसापर्यंत जि.प. आणि पं.स. करिता तब्बल ९९६ नामांकन दाखल झाले. या नामांकन अर्जाची गुरुवारी छाननी झाली. यात एकूण ३३ नामांकन अवैध ठरले. यामुळे आजच्या घडीला दाखल पैकी एकूण ९६३ नामांकन वैध ठरले आहे.
अवैध ठरलेल्या नामांकनात जिल्हा परिषदेत एकूण १३ तर पंचायत समितीकरिता नामांकन दाखल करणाऱ्या २० उमेदवारांचे अर्ज काही त्रुट्यांमुळे नामंजूर झाले. यामुळे आजच्या घडीला जिल्हा परिषदेकरिता ३५९ तर पंचायत समितीकरिता ५६७ उमेदवार वैध ठरले आहेत. आज झालेल्या छानणीत काही राजकीय पक्षांना फटका बसल्याचे दिसून आले. हिंगणघाट जिल्हा परिषदेत शिवसेना आणि समुद्रपूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर झाला आहे. तर वर्धा तालुक्यातील बोरगाव (मेघे) पंचायत समितीतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज एकाच अनुमोदकाच्या कारणाने नामंजूर झाले. यामुळे येथे सेनेचे पंचायत समितीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
बुधवारी जिल्हा परिषदेकरिता एकूण ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले होते. आॅनलाईन पद्धतीत दाखल झालेल्या या नामांकनासोबत आवश्यक कागदपत्र आहे अथवा नाही, दाखल झालेले नामांकन अर्ज नियमाप्रमाणे आहेत अथवा नाही याची आज आठही तालुका स्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी झाली.
तपासणीनंतर गट आणि गणाकरिता एकूण ९६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी अंतिम यादी जाहीर होणे बाकी आहे. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख ७ फेबु्रवारी असून त्या दिवसापर्यंत किती उमेदवार रिंगणात राहतील यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याच दिवशी अपक्ष असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. यामळे वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण आपली उमेदवारी कायम राखतो याकडे जिल्ह्यातील ७.६० लाख मतदारांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: After scrutiny 33 nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.