तीन वर्षे लोटूनही रोहित्र दुरुस्त होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:33 PM2019-08-18T23:33:10+5:302019-08-18T23:34:25+5:30
शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते. संबधित विभागाकडे वारंवार रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
तीन वर्षांपूर्वी गावठाणावरील विद्युत दाब कमी करण्यासाठी दोन रोहित्र बसविण्यात आले. मात्र, रोहित्र सुरू करण्याचा संबंधितांना विसर पडला. रोहित्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे दोन्ही रोहित्र नादुरुस्त असल्याने अद्याप बंद आहेत. सध्या शिवणफळ गावातील गावठाणावरील एकाच रोहित्रावरून पाणी पुरवठा योजनेच्या जोडणीसह २० कृषिपंपाला जोडणी देण्यात आली आहे. यामुळे विद्युत रोहित्रावर अधिक दाब येत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. परिणामी पीठ गिरण्या बंद राहतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे.
महिलांना चार ते सहा किलोमीटर अंतरावरील गावातून दळण दळून आणावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडे रोहित्र बदलविण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.
या गावातील शेतशिवारातील कृषिपंपाची जोडणी स्वतंत्र करण्याच्या हेतूने दोन ठिकाणी रोहित्र उभारण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने रोहित्र उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र या रोहित्राला विद्युत पुरवठा केलाच नाही. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत दोन्ही ठिकाणचे रोहित्र निकामी पडलेले आहे. तीन वर्षे लोटूनही या समस्येकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने दोन्ही रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विद्युतवाहिनी गेली चोरीला
शिवणफळ गावातील बसस्थानक लगतच्या झोपडपट्टी भागातील प्रवाहित तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र अद्यापही कंपनीच्या अधिकाºयांना याविषयी कुठलीही माहिती नाही, हे नवलच. यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे. याविषयी नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा योजनेला फटका
शिवणफळ गावठाण रोहित्रावरून गावाला आणि नळयोजनेला विद्युत पुरवठा होत आहे. मात्र, याच रोहित्रावरून २० कृषिपंप आणि दोन पीठगिरण्या चालत असल्याने रोहित्रावर अधिक विद्युत दाब येतो. यामुळे वारंवार रोहित्रात बिघाड येतो. यामुळे निम्मे गाव अंधारात असते. या प्रकारामुळे गावात वीजपुरवठ्याचा नित्याने लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे.