अडीच वर्षांनंतर महाशिवरात्रीला फुलली शिवालये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:02+5:30
देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप्त असून, महाशिवरात्रीचे औचित्य साधून या ठिकाणी अनेक भाविकांनी काेविड नियम पाळून मंगळवारी भोले शंकराचे दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड संकट ओढावताच पहिले लॉकडाऊन जाहीर करीत भाविकांसाठी विविध मंदिरे बंद करण्यात आली. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात मृत्यू तांडवच घडविले. अशातच सध्या जिल्ह्यात कोविडची तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्याने तब्बल अडीच वर्षांनंतर महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांनी शिवालय गाठून महादेवा चरणी माथा टेकविला. एकूणच महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध शिवालयांत भाविकांचा मळाच फुलला होता. ‘बम बम भोले’ असा जयघोष करीत महिला आणि पुरुष भाविकांनी आज पहाटेपासूनच शिवालयांत दर्शनासाठी गर्दी केली होती.
कोटेश्वरला फुलला भाविकांचा मळा
- देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप्त असून, महाशिवरात्रीचे औचित्य साधून या ठिकाणी अनेक भाविकांनी काेविड नियम पाळून मंगळवारी भोले शंकराचे दर्शन घेतले.
वर्धा येथील प्राचीन महादेव मंदिर
- वर्धा येथील महादेवपुरा भागातील प्राचीन महादेव मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच महिला व पुरुष भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
- पहाटे कावड यात्रेकरूंकडून अभिषेक, तसेच आरती झाल्यावर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्यांना कोविड नियमांचे पालन करावे, अशा सूचना सेवाकरी भाविकांना देत होते.
ढगा भुवन परिसरात दर्शनार्थीचा मेळा
- आर्वी तालुक्यातील खरांगणा (मो.) नजीकच्या ढगा भुवन येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांनी भोले शंकरा चरणी माथा टेकविला. रापमचे निम्म्याहून अधिक कर्मचारी अजूनही संपात सहभागी राहून विलीनीकरणाचा लढा देत असले तरी मिळेल त्या वाहनाने भाविकांनी ढगा भुवन गाठून महादेवाचे दर्शन घेतले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पहारा दिला.
पोहणात झाला भोले शंकराचा जयघोष
- हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील रुद्रेश्वर मंदिरावर अनेकांची आस्था आहे. प्रवेरसेन (पहिला) यांचा नातू तथा रुद्रसेन यांचा पुत्र पृथ्वीसेन याने पोहणा गावाची निर्मिती केली. पित्याच्या आठवणीसाठी रुद्रसेन मंदिराची स्थापना पृथ्वी सेनाने याठिकाणी केल्याचे सांगितले जात असून, प्राचीन काळातील हे मंदिर वर्धा नदीच्या काठावर आहे. याच ठिकाणी मंगळवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्यांकडून कोविड नियमांचे पालन करून घेण्यात आले.