वर्धेशी आमटे परिवाराचे ऋणानुबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:13 PM2019-01-14T22:13:54+5:302019-01-14T22:14:07+5:30
आमटे कुटुंबिय आणि वर्ध्याचे संबंध फार जुने आहेत. बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. शिवाय त्यांना पहिल्यांदा कुष्ठरोगी दिसला तोही वर्धेत. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याची प्रेरणाही वर्धेतूनच मिळाली. त्यासाठीचे सुरूवातीचे प्रशिक्षण त्यांनी वर्धेत घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आमटे कुटुंबिय आणि वर्ध्याचे संबंध फार जुने आहेत. बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. शिवाय त्यांना पहिल्यांदा कुष्ठरोगी दिसला तोही वर्धेत. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याची प्रेरणाही वर्धेतूनच मिळाली. त्यासाठीचे सुरूवातीचे प्रशिक्षण त्यांनी वर्धेत घेतले. इतकेच नव्हे तर माझे आणि माझी पत्नी मंदाकिनी हिच्यातले प्रेमाचे सूतही वर्धेत जुळले, अशी माहिती पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी अग्निहोत्री कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना दिली.
स्थानिक बापूजीवाडी येथील अग्निहोत्री कॉलेजच्या आवारात जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने सोमवारी संक्राती स्रेहमिलन सेवा सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ. मंदाकिनी आमटे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री, चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, शिवकुमारी अग्निहोत्री, सचिन अग्निहोत्री, राधेश्याम चांडक, पुजा अग्निहोत्री, राजेश्वरी शिंदे, रमेश मुर्डीव, अशोक जैन, अरुणा जैन, श्रीराम शर्मा, सपना अग्निहोत्री आदींची उपस्थिती होती.
डॉ. आमटे पुढे म्हणाले, १९७० साली आदिवासी बहूल परिसर असलेल्या भागरागड येथे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी २५० किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागले. तेथे पोहोचल्यावर मानसाला मानुस घाबरतोय ही वास्तविक परिस्थिती आम्हाला अनुभवायला मिळाली. ही वास्तविक परिस्थिती बाबांनी सहलीच्या माध्यमातूनच आमच्यासमोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासींसाठी काम करण्याचा निर्णय आपण घेत असल्याची माहिती बाबांना दिली. जागा मिळावी म्हणून रितसर अर्ज सरकारदफ्तरी करण्यात आला. पण जागा मिळायलाही वेळ झाला. त्याच दरम्यान २४ डिसेंबर १९७२ ला रुढी व परंपरांना बगल देत माझा मंदाकिनीसोबत विवाह झाला. जागा मिळाल्यावर तेथे काम करण्यासाठी गेल्यावर तक्रारी करण्यासाठी माझ्या पत्नीसह सहकाऱ्यांना कारणे खूप होती. मात्र, त्यांनी ती कधीही तक्रार केली नाही. आदिवासींमध्ये शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. अशाच परिस्थितीत रुग्णाच्या कुटुंबियांना सदर रुग्ण आता बरा होऊ शकत नाही, जे काही करेल ते ईश्वर करेल असे म्हणत हात वर केलेला रुग्ण आमच्या झोपड्या शेजारी खांद्यावर खाट घेवून आलेले काही लोक सोडून गेले. त्या रुग्णाला शर्तीचे प्रयत्न करून उपचार केल्यावर त्याच रुग्णाने तीन दिवसांनी डोळे उघडले. शिवाय ज्या खाटेवर त्याला आणण्यात आले होते तीच खाट तो खांद्यावर घेवून पाचव्या दिवशी आमच्या झोपड्यांपासून निघून गेला. विशेष म्हणजे मांत्रिकाने रात्रीच्या वेळी कुणाला न माहिती होऊ देता आपल्या मुलीला उपचारासाठी आमच्याकडे आणले. ती मुलगी बरी झाल्यावरही आम्ही तीन आणखी दोन दिवस जास्त आपल्याकडे ठेवून घेतले. त्यामागील खरा उद्देश आदिवासींना अंधश्रद्धेच्या काळोखातून बाहेर काढण्याचा होता, असे यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले. संचालन प्रा. प्रफुल्ल दाते व प्राचार्य स्वरा अष्टपुत्रे यांनी केले तर आभार डॉ. अशोक बिरबल जैन यांनी मानले.
आचार्य पदवीप्राप्त करणाºयांचा सत्कार
पी.एच. डी. प्राप्त डॉ. स्मिता कालोकर मशानकर, डॉ. वनिता ठाकरे, डॉ. ममता साहू, डॉ. पंकज ठाकरे, डॉ. अनिस बेग, डॉ. रवींद्र बेले, डॉ. राम सावनेकर , डॉ. अजय कोल्हे, डॉ. भूषण लांडे, डॉ. गिरीश वैद्य, डॉ. प्रशांत येऊलकर, डॉ. प्रणव चरखा, डॉ. उज्ज्वल गुल्हाणे, डॉ. सुरेंद्र तिवारी, डॉ. संदीप घोडीले, डॉ. भारद्वाज, डॉ. सुमंत ढोबळे, डॉ. रसिका कावळे, डॉ. अस्मिता राजूरकर यांचा कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्याभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकरी हितार्थ धान्याचे कोठार उभे केले : चांडक
सावकाराच्या दारामध्ये शेतकरी जावू नये यासाठी मी सहकारी संस्थेच्या कक्षा रुंदावल्या. आमच्या या सहकार कार्यातून राज्य शासनाजवळ जेवढे धान्याचे कोठारे नाही, त्याहीपेक्षा जास्त धान्याचे कोठार आम्ही देशात उभे केल्याचे राधेश्याम चांडक म्हणाले. याप्रसंगी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या स्नुषा राजेस्वरी शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
हिंस्त्र प्राण्यांनाही प्रेमाची भाषा कळते
आदिवासींना शिक्षित करण्यासाठी हेमलकसा येथे शाळा सुरू करण्यात आली. तेथील पहिल्या बॅचमधील विद्यार्थी डॉक्टर, वनविभागात अधिकारी तर शिक्षक झाले. विशेष म्हणजे, सध्या माझा नातू व नातीन त्याच शाळेत मराठीत शिक्षण घेत आहेत. सध्या आमच्याकडे एकूण १२५ प्राणी असून पहिला वन्यप्राणी माकडाचे पिल्लू होते. ते माकडाचे पिल्लू मृत आईला बिलगून दूध पित होते. ते शिकार करणाºया आदिवासी बांधवांकडून तांदूळ देऊन त्याला जीवदान देण्यात आले. आमच्याकडे असलेल्या प्राण्यांमध्ये हिंस्त्र प्राणीही आहेत. परंतु, ते प्रेमाची भाषा समजतात, हे सत्य असून ते आपण अनुभवले आहे. सिंहाचे पिल्लू हरविले होते. त्याचा शोध घेताना त्याचा मित्र झालेल्या श्वानाच्या पिल्लाचा कान पिळल्यावर सिंहाचे पिल्लू झुडपातून बाहेर आले होते. तर नेगली नामक वाघिण हिने गोंडस छाव्याला जन्म दिल्यावर तिनेच आपल्या पिल्लाला तोंडात धरून ते सर्वांना दाखविले होते, असे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.
समाजाला शिक्षित, दीक्षित व प्रशिक्षित करावे - अग्निहोत्री
राजकारण तत्वाशिवाय होत नाही. आपला संकल्प चांगला असेल तर विकल्प निश्चितच मिळेल. श्रम, परिश्रम, पराकाष्ठा कराल तर पुरुषार्थ प्राप्त होईल. समाजाला शिक्षित, दीक्षित व प्रशिक्षित करावे, असे यावेळी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.
बरा झालेला रुग्णच रुग्णालयाचा अॅम्बॅसिडर झाला - मंदाकिनी आमटे
आदिवासींसोबत काम करताना त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास पूर्वी आम्हाला करावा लागला. भाषा अडथळा ठरत असल्याने त्यांची भाषा आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला. शेकोटीत पडून ४० टक्के भाजलेला मुलगा बरा झाल्यावर रुग्णालयाची माहिती आदिवासी लोकांना देण्यासाठी तोच मुलगा आमच्या रुग्णालयाच्या अॅम्बॅसिडर बनल्याचे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.
पुस्तकांचे केले प्रकाशन
शिक्षणमहर्षी आणि प्रवचन संग्रह या दोन पुस्तिकांचे प्रकाशन तसेच एजीआयच्या अंकाचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.