बँक ऑफ इंडियासमोर ‘प्रहार’चे ढोलताशा आंदोलन; तत्कालीन व्यवस्थापकावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 05:33 PM2022-03-30T17:33:08+5:302022-03-30T18:38:40+5:30
तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
आर्वी (वर्धा) :बँक ऑफ इंडिया शाखेतील बँक मित्राने बँकेतील तत्कालीन कर्मचारी व व्यवस्थापकाच्या संगनमताने कोटी रुपयांचा केलेला अपहार प्रहारचे बाळा जगताप यांनी उघडकीस आणला होता. मात्र, घोटाळ्यातील बँक मित्रासह तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात बँक ऑफ इंडिया शाखेसमोर ढोलताशा वाजवून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे.
यापूर्वी केलेल्या आंदोलन व बैठकीनंतर पीडित ग्राहकांना त्यांचे नुकसानाचे पैसे मिळणे सुरू झाले होते. काही ग्राहकांना पैसेही मिळाले. मात्र,त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न करता बँक प्रशासन त्यांना यापेक्षाही मोठा दरोडा टाकण्याची सूट तर देत नाही ना? हा प्रश्न यानिमित्ताने उभा होतो. या सर्व प्रकरणात सहभागी सर्वांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी बाळा जगताप यांनी आंदोलनादरम्यान केली.