आमदार करणार नागरिकांसह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:30 AM2018-05-09T00:30:42+5:302018-05-09T00:30:42+5:30
धुनिवाले मठ ते धंतोली चौकापर्यंत असलेल्या बॅचलर रस्त्याच्या कामाव्या गुणवत्तेबाबत अनेकवार प्रश्न उपस्थित झाले. याची माहिती जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी दिली. त्यांनी संबंधित यंत्रणेला जागेवर बोलवून हा प्रकार अयोग्य असून त्यावर वेळीच कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धुनिवाले मठ ते धंतोली चौकापर्यंत असलेल्या बॅचलर रस्त्याच्या कामाव्या गुणवत्तेबाबत अनेकवार प्रश्न उपस्थित झाले. याची माहिती जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी दिली. त्यांनी संबंधित यंत्रणेला जागेवर बोलवून हा प्रकार अयोग्य असून त्यावर वेळीच कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेल्या सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली. यानंतरही कामातील अनागोंदी सुरूच होती. यामुळे अखेर खुद्द आ.डॉ. पंकज भोयर यांनी या रस्त्याच्या कामातील हयगय दूर करण्याकरिता नागरिकांसोबत स्वत: आंदोलन करू, असा इशारा सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी एका पत्राद्वारे दिला आहे.
शहरातील बॅचलर रोड म्हणून ओळख असलेल्या या रस्त्याच्या रूंदीकरणासह त्याच्या सिमेंटीकरणासाठी राज्य शासनाने २५ कोटी रुपयांची तरतूद केली. ही तरतूद करताना रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या होत असलेल्या या कामात कुठेही गुणवत्ता दिसत नाही. त्याच्या दर्जाबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याला आत्ताच भेगा पडल्या आहेत. याबाबत नागरिकांकडून ओरड होत आहे. शिवाय या रस्त्याचे मोजमाप केले असता तो कुठे कमी तर कुठे अधिक असल्याचे दिसून आले.
हा रस्ता ३० मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. आज कालावधी संपून महिना लोटला आहे, तरीही हे काम पूर्ण झाले नाही. असे असताना काम करणाºया कंत्राटदाराला संबंधित विभागाकडून विचारणा झाली नाही. रस्त्यालगतच्या नाल्यांसह रस्ता दुभाजकाचे कामही अर्धवटच आहे. याचा त्रास या भागातील नागरिकांना होत आहे. तत्सम तक्रारी नागरिकांकडून आ.डॉ. पंकज भोयर यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीवरून त्यांनी मध्यंतरी रस्त्याची पाहणी केली होती. त्याच वेळी रस्त्याच्या कामाचा मुद्दा गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या होत्या. याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर आमदारांनी नागरिकांची अडचण लक्षात घेत येत्या आठ दिवसांत जर या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना एका पत्राद्वारे दिला असल्याचे त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
२५ कोटींच्या रस्त्याला पडल्या भेगा
धुनिवाले मठ ते धंतोली चौक असे अंतर असलेल्या येथील बॅचलर रस्त्याच्या कामांत कमालीची हयगय होत असल्याचे दिसून येत आहे. कामाचा कालावधी संपुनही निकषानुसार काम नसल्याची ओरड आहे. तब्बल २५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या रस्त्याच्या कामांत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप अनेकवार झाले. यात आमदारांकडून पाहणी केली असता अनेक अनियमितता समोर आल्या. यावेळी सूवना देवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले आहे.