वर्धेतील गोलबाजारात अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:00 AM2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:12+5:30
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांना अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने दुकानातील तसेच दुकानाबाहेरील साहित्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरतील मुख्य बाजारपेठ भागातील गोलबाजार परिसरात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात २४ दुकानातील साहित्य तसेच तब्बल २२ हातगाड्या जळून कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांना अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने दुकानातील तसेच दुकानाबाहेरील साहित्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, न.प. मुख्याधिकारी विपिन पालिवाल, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तर मारोती वाघाडे, किशोर गाडेवान, चंदू तपासे यांनी पंचनामा केला.
गल्ल्यातील रोकडीचाही झाला कोळसा
अचानक लागलेल्या आगीत दुकानातील विविध साहित्यासह गल्ल्यातील रोकडीचाही जळून कोळसा झाल्याने या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
श्वानाच्या चार पिल्लांचा होरपळून मृत्यू
अचानक लागलेल्या आगीत श्वानाच्या चार पिल्ल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याची नोंदही पंचनामा करते वेळी पोलिसांनी घेतली आहे.
अचानक लागलेल्या आगीचे कारण गुलदस्त्यात
या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असली तरी आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
या व्यक्तींची जळाली दुकाने
गोलबाजार परिसरात लागलेल्या आगीत सुशील देशभ्रतार, राजेंद्र खेकडे, बबन ठाकरे, प्रफुल्ल भोयर, प्रमोद भोयर, गजानन आडे, माणिक ठेंगळे, वहिद खान गफ्फार खान, राजेश संगलनी, असलम बेग मिर्झा बेग, कमलेश चकोले, राजू हरजे, मोहम्मद अंसार शेख, मनोज भेंडारे, रामकिशन गुप्ता, रवींद्र वैद्य, अविनाश बंडेवार, आशिष लोणकर, अशोक भोवरे, वसंता पिंपळे, प्रेमचंद गुल्हाणे, रामू शेंडे, शेख इमान शेख सत्तार कुरेशी, शेख शाहरुख कुरेशी यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले.
या व्यक्तींची जळाली हातगाडी
अचानक लागलेल्या आगीत किरण गुजर, दिनकर ढोबळे, साजीद सय्यद सईद सय्यद, नीरज हरगे, तन्वीर बेग अस्लम बेग, मुबारक मेहबूब कुरेशी, शेख आदील शेख सलीम, भागवत म्हस्के, संतोष लोहकरे, शरद पाटील, राहुल कांबळे, केशव ठाकरे, मयूर तिवस्कर, महेश खेकडे, आकाश शेंडे, सतीश दांडेकर, सुदेश मून, जुनेस शेख हुसेन, गौरव पांडे, अमोल देशभ्रतार, सुनील हरगे, तौसिफ खान करिम खान यांच्या हातगाडीसह हातगाडीवरील संपूर्ण साहित्य जळाले.