कृषी सहायकांनी कपाशी पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:41 PM2017-11-24T23:41:27+5:302017-11-24T23:41:55+5:30
जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कपाशी उत्पादक शेतकºयांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत कृषी सहायकांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या झालेल्या शेतांचे त्वरित सर्वेक्षण करावे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकºयांशी संवाद साधताना केल्या.
जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने गुरूवारी आर्वी तालुक्यातील दुधबर्डी, सेलू तालुक्यातील आकोली, समुद्रपूर तालुक्यातील बरबडी व कांढळी येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली. या पथकामध्ये गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मस्कर, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ विशाल उबरांडे, कृषी विभागाचे धर्माधिकारी आदींचा समावेश होता. या पथकाने चार तालुक्यातील सुमारे दहा कपाशी उत्पादक शेतकºयांच्या शेतातील बोंडअळीने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. बागायतदार व भारी जमिनीमधील कपाशी पिकांवर बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रसंगी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांशी संवाद साधून त्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी जरी नसला तरी सध्या सापळे लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय कृषी सहायकांना गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील किती हेक्टर कपाशी क्षैत्रात नुकसान झाले, ही बाब समोर येणार आहे.