शेतमजूर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 06:00 AM2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:24+5:30
मनरेगाची कामे सर्व शेतमजुरांना जिल्हाभर ग्रामीण भागात उपलब्ध करून द्या, शेतमजुरांना इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळात समाविष्ट करा, अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्व शेतमजुरांना राहत्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या, आदी ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतमजुरांना राहायला गावात पक्की घरे नाहीत. गावाबाहेर अथवा शेतात तो झोपड्यांमध्ये राहतो. महागाई वाढते; मात्र मजुरी वाढत नाही. महागड्या कॉन्व्हेंट संस्कृतीचे शिक्षण मुलांना देऊ शकत नाही. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा शेतमजुरांच्या मुलांमुळे अस्तित्वात आहेत. शेतातील नवीन तंत्रज्ञान व मशिनरीमुळे शेतमजुरांचा रोजगार हिरावला गेला. शेतीला पूरक उद्योग असलेला जिनिंग-प्रेसिंग प्रक्रिया उद्योगही बंद पडले. वर्षातून काही ठरावीक वेळेतच शेतमजुरांना शेतीत काम मिळते. इतर दिवस त्यांना बांधकाम, रोहयो, मनरेगाची कामे करावी लागतात. शेतमजूर हा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लाभापासून वंचित असल्याने शेतमजुरांना इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात समाविष्ट करून न्याय द्यावा, असे विचार नगरसेवक यशवंत झाडे यांनी व्यक्त केले. केळझर येथील धम्मराजीक बौद्ध विहारात महाराष्टÑ राज्य शेतमजुर युनियनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शेतमजूर संमेलनात ते बोलत होते.
यावेळी राज्य सचिव बळीराम भुंबे, विशाल गोरे परळी, दिलीप शापामोहन, सिताराम लोहकरे, संध्या संभे, आनंद खंडागळे, मनोहर ठाकरे, प्रभाकर गावंडे यांची उपस्थिती होती. मनरेगाची कामे सर्व शेतमजुरांना जिल्हाभर ग्रामीण भागात उपलब्ध करून द्या, शेतमजुरांना इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळात समाविष्ट करा, अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्व शेतमजुरांना राहत्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या, आदी ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले.
संचालन संध्या संभे तर प्रास्ताविक सिताराम लोहकरे यांनी केले. आभार आनंद खंडागळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आशा इखार, कांचन हिंगे, मधुकर कार्लेकर, मनोहर चिकराम, दिलीप सुटे, सुनीता कुडमते, सचिन मोरे, अन्वर शेख, जोहरा शहा, रेखा गेडाम, विजय कथलीकर, गणेश निंबेकर, नीलेश शिरभाते आदींनी सहकार्य केले. संमेलनाला वर्धा, सेलू, आर्वी आणि आष्टी तालुक्यातून २५० हून अधिक शेतमजूर होते.