पाच विधेयकांविरोधात तीन दिवस कृषी केंद्रांना टाळे; राज्यभर पुकारला संप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:33 PM2023-11-03T16:33:55+5:302023-11-03T16:36:18+5:30

ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांची अडचण

Agriculture Centers blocked for three days against five Bills; A strike was called across the state | पाच विधेयकांविरोधात तीन दिवस कृषी केंद्रांना टाळे; राज्यभर पुकारला संप

पाच विधेयकांविरोधात तीन दिवस कृषी केंद्रांना टाळे; राज्यभर पुकारला संप

वर्धा : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या पाच विधेयकांविरोधात माफदा आणि कृषी व्यावसायिक संघांकडून राज्यभर तीन दिवस संप पुकारला आहे. वर्धा जिल्ह्यातील कृषी केंद्र व्यावसायिकांनीही आजपासून आपले कृषी केंद्र बंद ठेवले आहे. जिल्ह्यातील हजारावर कृषी केंद्र बंद असल्याने ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.

शासनाचे प्रस्तावित विधेयक ४०, ४१, ४२, ४३ तसेच ४४ मधील तरतुदी कृषी विक्रेत्यांकरिता अडचणीच्या आहेत. त्यामुळे कृषी व्यावसायिकांना विक्री करणे अशक्य होणार आहे. कोणतेही विक्रेते कृषी निविष्ठेचे उत्पादन करीत नाही. कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा सीलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना तशाच सीलबंद पॅकिंगमध्येच विक्री करतात. त्यामुळे कृषी व्यावसायिकांना सीलबंद व पॅकिंगमध्ये निविष्ठांचे दर्जाबाबत दोषी समजण्यात येऊ नये. योग्य निविष्ठा विकणारे कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर अन्यायकारी कायदे विक्रेत्यांवर लादू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रवी शेंडे, सचिव मनोज भूतडा, अभिलाष गुप्ता, उमेश मुंदडा, गणेश चांडक, शिरीष काशिकर, भगीरथ चांडक, रमेश कोठारी, रोशन चांडक, आनंद चांडक, नरेंद्र पाटील, सिझवान शेख, श्रीकांत काशिकर, भूपेश राठी, हनमंत मदान, गीतेश चांडक, निखिल राठी, महेश राठी, श्रीनिवास चांडक, दिनेश कोठारी, विनीत बदनोरे, रवी बदनोरे आदींची उपस्थिती होती.

शासनाला विनंती केली व्यर्थ गेली, म्हणून पुकारला संप

नवीन पाच विधेयकांचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी निवेदने देण्यात आली. राज्यभरातील कृषी व्यावसायिक संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पत्र पाठवून कायदे रद्द करण्याची विनंती केली. परंतु याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. परिणामी प्रस्तावित कायद्यांमुळे कृषी व्यवसाय करणे अशक्य होणार असल्याने हा संप पुकारावा लागल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते दृष्टिक्षेपात

एकूण कृषी निविष्ठा विक्रेते-४०८९

बियाणे विक्रेते-१३४३

खत विक्रेते-१४५०

कीटकनाशक विक्रेते-१२९६

तालुकानिहाय विक्रेत्यांची आकडेवारी काय सांगतात

तालुका - बियाणे विक्रेते - खत विक्रेते - कीटकनाशक विक्रेते

  • वर्धा - २६३ - ३०५ - २६८
  • सेलू - १८६ - २०१ - १८३
  • देवळी - १६३ - १७५ - १५८
  • आर्वी - ०९२ - ०९७ - ०८४
  • आष्टी - ०८५ - ०८६ - ०७९
  • कारंजा - ०७४ - ०७६ - ०७२
  • हिंगणघाट - ३२१ - ३४६ - २९६
  • समुद्रपूर - १५९ - १६४ - १५६

Web Title: Agriculture Centers blocked for three days against five Bills; A strike was called across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.