तालुका कृषी अधिकाऱ्याने लाखोंची बनावट बिले केली पास, 'असा' अडकला जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 11:32 AM2021-12-29T11:32:24+5:302021-12-29T11:33:32+5:30
सिद्धप्पा नडगेरी याला ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याचे घबाड आता बाहेर येत असून, या सर्व प्रकरणांची विभागीय चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
वर्धा : आष्टी (शहीद) येथील प्रभारी तालुका कृषी अधिकारी सिद्धप्पा नडगेरी याने कार्यालयात हुकूमशाही राजवट चालविली होती. कार्यालयीन कर्मचारी व कृषी सहायकांना दबावात ठेवून त्यांच्या हातून बोगस बिले तयार करून त्याने ती पास केल्याची माहिती मिळाली आहे. अशा रीतीने त्याने लाखो रुपयांची वरकमाई केल्याचीही माहिती पुढे येऊ लागली आहे.
सिद्धप्पा नडगेरी याला ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याचे घबाड आता बाहेर येत असून, या सर्व प्रकरणांची विभागीय चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
२०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या शेतीशाळा, शेती अवजारे, फळबाग लागवडीची प्रकरणे मंजुरीसाठी व अनुदान काढण्यासाठी नडगेरी याने मनमानी कारभार चालविला होता. मोठ्या प्रमाणात शेतीशाळेचे बनावट बिल तयार करून कार्यालयातील लिपिकावर दबावतंत्राचा वापर करून ती पास केली. यामधून लाखो रुपयांची माया जमविल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या अखेर साडेसात लाख रुपयांची बोगस बिलांची उचल केल्याची माहितीही पुढे आली आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या घरी जाऊन थेट पैशाची मागणी करणे, असे प्रकार अनेकदा उघडकीस आले होते. महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासही दिला होता. एका महिलेने राज्य मानवाधिकार आयोगापर्यंत धाव घेतली होती. याची विभागीय पातळीवरून चौकशी सुरू आहे. त्यामुळे ते चांगलेच वादग्रस्त तालुका कृषी अधिकारी ठरले.
नडगेरी यांच्या काळातील सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
-सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी