२६.७१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:16 PM2018-02-24T22:16:46+5:302018-02-24T22:16:46+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागते.
प्रशांत हेलोंडे ।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी वन विभागाला पार पाडावी लागते. यासाठी वन विभागाकडून रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. यंदा जिल्ह्यात २६ लाख ७१ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी वन विभागाने तयारी चालविली आहे.
रोपांची उपलब्धता व्हावी म्हणून जिल्ह्यात रोपवाटिका सज्ज केल्या जात आहेत. सध्या पाच गावांत सुसज्ज रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. या नर्सरीमध्ये पाच राऊंड नेट शेड तयार करण्यात आले असून प्रत्येकी ८५ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या माध्यमातून ४ लाख २५ रोपे उपलब्ध होणार आहेत. अशा रोपवाटिका जिल्ह्यातील प्रत्येक वनपरिक्षेत्रात तयार करण्यात येत आहेत. यासाठी वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ तथा वन व्यवस्थापन समिती प्रयत्नरत आहे.
जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राऊंड नेट शेडच्या माध्यमातून रोपे तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वर्धा, तळेगाव (श्या.पं.) वनपरिक्षेत्रातील जसापूर, कारंजा (घा.) क्षेत्रातील आमदरी, आर्वी क्षेत्रातील सारंगपुरी आणि समुद्रपूर क्षेत्रातील आजदा या पाच गावांत रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहे. सन २०१८ च्या पावसाळ्यात वर्धा जिल्ह्याला २६ लाख ७१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. कुठेही रोपांची कमतरता भासू नये म्हणून तब्बल ३० लाख रोपे तयार करून ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपांची लागवड करण्यात येणार आहे. शिवाय अन्य वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्नही वन विभागाकडून केले जाणार आहेत. वनविभाग रोपवाटिका भक्कम करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे.
वनविभाग करणार ७.९५ लाख वृक्षांचे रोपण
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात २६ लाख ७१ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाने रोपे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शासकीय तथा निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांनाही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यात वन विभागाद्वारे ७ लाख ९५ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. सामाजिक वनीकरणमार्फत ७ लाख, ग्रा.पं. च्या माध्यमातून ६ लाख ३० हजार तर अन्य शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्याकडून १३ लाख ८२ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
स्थळ निश्चितीचे काम सुरू
जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून जागा निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांचे यासाठी मार्गदर्शन घेतले जात असल्याची माहिती वन विभागाने दिली.
रोपवाटिकांचेही होणार सक्षमीकरण
आजपर्यंत वन विभागाच्या रोपवाटिका त्या-त्या वनपरिक्षेत्र कार्यालय तथा अन्य शासकीय जमिनीमध्ये तयार केली जात होती. आता रोपवाटिकांचेही सक्षमीकरण वन विभागाकडून करण्यात येत आहे. यासाठी सध्या पाच गावांत प्रायोगिक तत्वावर काम सुरू करण्यात आले आहे. राऊंड नेट शेडच्या माध्यमातून ही रोपे तयार केली जाणार असून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.