घोराडच्या मारबत मिरवणुकीने केले भ्रष्टाचाराला लक्ष्य
By Admin | Published: September 4, 2016 12:35 AM2016-09-04T00:35:50+5:302016-09-04T00:35:50+5:30
संतांच्या वास्तव्याने विदर्भात लौकिकप्राप्त घोराड येथे मार्बत मिरवणूक काढण्यात आली.
घोराड : संतांच्या वास्तव्याने विदर्भात लौकिकप्राप्त घोराड येथे मार्बत मिरवणूक काढण्यात आली. यात संताला युवकांनी आर्त हाक देत ‘केजुबाबा भ्रष्टाचाऱ्यांनी कुठे नेऊन ठेवले हे घोराड’ असा नारा देत मार्बत मिरवणूक काढल्याने सामान्य नागरिक अंचबित झाले.
ग्रा.पं. सत्ताधारी व विरोधकांची युती स्वत:च्या भल्यासाठी विकासाला मुठमाती देत आहे. संत नगरीचे नावलौकिक कमी करणाऱ्या देवस्थान कमिटीला घेऊन जागे मार्बतचे फलक प्रथमच घोराड नगरीत या माध्यमातून झळकले. पाणी पुरवठा योजनेत झालेला गैरप्रकार व विठ्ठल-रुखमाई देवस्थान कमिटीविरूद्ध असलेल्या असंतोषाचा भडकाही लक्ष्य करण्यात आला. मार्बतीचे औचित्य साधून कॅन्सर, एड्स सारख्या जीवघेण्या रोगापासून वाचा, स्त्री-भ्रूणहत्येला आळा घाला, अवयव दान करा, रक्तदान करा, अपंगांना मदतीचा हात द्या, बेटी बचाओ बेटी पढाओ, शेतकरी स्वामिनाथन आयोग लागू करा, वेळोवेळी लसीकरण करा, आरोग्याची काळजी घ्या, शिका संघटीत व्हा संघर्ष करा, असे फलकही मिरवणुकीत असल्याने जनजागृतीची ही पहिलीच मार्बत निघाल्याची चर्चा होती. मिरवणुकीत बालगोपाल व युवा मंडळींचा सहभाग होता. विठ्ठल -रुखमाई मंदिरापासून निघालेली मार्बत शांततेत पार पडली.(वार्ताहर)