गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 12:13 PM2022-06-27T12:13:10+5:302022-06-27T12:19:29+5:30

या संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरीही संमेलनाचा अध्यक्ष कोण? याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे.

Akhil Bharatiya Sahitya Sammelan will be held in Gandhinagar Wardha, but who will be the president of sammelan | गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

googlenewsNext
ठळक मुद्देअद्याप तारीख अनिश्चित, पण नावांची चर्चा जोरात

आनंद इंगोले

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या वर्ध्यातील गांधीनगरीला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर संमेलन घेण्याचे ठरले असून आता या संमेलनाचा अध्यक्ष कोण? यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

वर्ध्यामध्ये नवसाहित्यिकांना बळ देण्यासह साहित्य चळचळ वृद्धिंगत करण्याचे कार्य विदर्भ साहित्य संघाच्या वतीने अविरत सुरु आहे. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्ताने या वर्षी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे. यापूर्वी १९६९ मध्ये पु. शि. रेगे यांच्या अध्यक्षतेत ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच स्वावलंबी शाळेच्या मैदानावर घेण्यात आले होते. आता तब्बल ५३ वर्षांनंतर पुन्हा हा मान मिळाला असून वर्ध्यात सारस्वतांचा महामेळा भरणार आहे. या संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरीही संमेलनाचा अध्यक्ष कोण? याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे.

वर्ध्यात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता काही निकषही लावले जात असून आगामी अध्यक्ष विदर्भातील असावा, वर्ध्याशी नाळ जुळलेला असावा, गांधी विचारवंत असावा आणि सर्वोदयी कार्यकर्ता असावा, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगायला लागली आहे. केवळ कविता, कथा, कादंबरी लिहिणाराच साहित्यिक नव्हे तर सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करणारा विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता असेल तर संमेलनाध्यक्ष पदाच्या कक्षा रुंदावतील, असेही मत काहींनी व्यक्त केले आहे. परंतु आता महामंडळाकडून कुणाचे नाव जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुणी म्हणतंय डॉ. अभय बंग तर कुणी श्याम मानव

सोशल मीडियावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या नावाची चर्चा सुरु असताना यामध्ये काहींनी विनोबा-गांधी विचाराचे कृतिशील विचारवंत, लेखक व संशोधक पद्मश्री डॉ. अभय बंग तर कुणी दीर्घकाळ वर्ध्यात राहिलेले, आजही वर्ध्याशी आणि गांधीविचारांशी नाळ जुळलेले, विनोबांच्या आश्रमात रुळलेले, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष करीत असलेले, पुरोगामी विचारक, लेखक आणि प्रभावी वक्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचे नाव पुढे केले आहे. यावर अनेकांनी आपापली मतेही व्यक्त केली आहे.

डॉ. अभय बंग का?

गांधी विनोबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास करणारे. गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक डॉ. अभय बंग हे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकाने ते घराघरांत पोहोचले आहे. वैद्यकीय जगताबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांचे चिंतन व कृती महत्त्वपूर्ण आहे. १९९३ मध्ये लोकचळवळीच्या माध्यमातून अभय बंग यांच्या नेतृत्वात लागू झालेली दारूबंदी, अनेक साहित्यकृती, वैचारिक दिशा देणारे लेख डॉ. अभय बंग यांचे नावे आहेत. म्हणून गांधी-विनोबांच्या कर्मभूमीत होऊ घातलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी-विनोबांच्या विचारांचे पाईक असलेले डॉ. बंग यांची निवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.

श्याम मानव का?

इंग्रजी विषयाचे शिक्षक असलेल्या श्याम मानवांची मराठीत दोन डझनांहून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा वाचकवर्गही मोठा आहे. अनेकानेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास असून युथ कॉलम, सिनेनाट्य परीक्षण, समीक्षण, मुलाखती यांसह नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. मुद्र्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि नव्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही प्रा. श्याम मानव सातत्याने विवेकवादी, विज्ञानवादी व संवैधानिक मांडणी करतात. प्राच्यविद्या, लोकपरंपरा आणि संतसाहित्यापासून स्वसंमोहन, अद्ययावत आयुर्विज्ञान ते नवसंशोधनांपर्यंत चौफेर चिकित्सक अभ्यास त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानातून अनुभवायला मिळतो. म्हणून अध्यक्षपद श्याम मानवांना मिळाल्यास हे संमेलन ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे होईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.

Web Title: Akhil Bharatiya Sahitya Sammelan will be held in Gandhinagar Wardha, but who will be the president of sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.