अ.भा. मराठी साहित्य संमेलन; मुख्यमंत्री शिंदेंचे आगमन आनंददायी, नितीन गडकरींची अनुपस्थिती
By अभिनय खोपडे | Published: February 3, 2023 12:52 PM2023-02-03T12:52:06+5:302023-02-03T12:54:37+5:30
संमेलन गीत तसेच दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाला आरंभ
वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने गांधी आणि विनोबांच्या या ऐतिहासिक भूमीला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. आज, शुक्रवारी 3 फेब्रुवारीला साहित्य संमेलनास परंपरागत ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. बरोबर ४० मिनिटे उशिरा आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन आनंददायी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती आयोजकांवर नाराजीची लकेर उमटवणारी ठरली.
मंत्री दीपक केसरकर, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे, नरेंद्र भोंडेकर, गिरीश गांधी, मावळते अध्यक्ष भारत सासणे, कार्यवाह प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व अन्य मान्यवर प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर विराजमान झालेत. ना. गडकरी यांच्या कौटुंबिक स्नेह असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्याने ते येऊ शकले नसल्याचे कळले. ‘लाभले आम्हांस भाग्य…’ हे कविवर्य सुरेश भट यांचे गीत व संमेलन गीत तसेच दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाला आरंभ झाला. साहित्य संमेलनासाठी दोन कोटी निधी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे उषाताई तांबे यांनी आभार मानले.