अवैद्य दारूविक्रीची उलाढाल कोटींच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:53 PM2018-09-03T22:53:43+5:302018-09-03T22:55:42+5:30
महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात राज्यात सर्वप्रथम दारूबंदी करण्यात आली. परंतु ही दारूबंदी कागदावरच उरली आहे. जिल्ह्याच्या शेकडो गावांमध्ये राजरोसपणे हातभट्टीची दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात राज्यात सर्वप्रथम दारूबंदी करण्यात आली. परंतु ही दारूबंदी कागदावरच उरली आहे. जिल्ह्याच्या शेकडो गावांमध्ये राजरोसपणे हातभट्टीची दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे. शिवाय चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारू जिल्ह्यात पाठविली जात आहे. आठही तालुक्यात १९ पोलीस ठाण्यांतर्गत दारूच्या अवैद्य खरेदी-विक्रीचा व्यापार कोट्यावधीच्या घरात आहे. यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात पोलीस प्रशासनालाही फारसे यश आलेले नाही.
वर्धा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी वाढलेली आहे. बोरधरण व परिसरात नागपूरवरून दररोज चोरट्या मार्गाने दारू आणली जाते व त्याची विक्री केली जाते. तसेच या परिसरातून वाहणाऱ्या बोर नदीच्या काठावर शेकडो हातभट्ट्या सुरू आहेत. याची माहिती पोलीस प्रशासनालाही आहे. मात्र यावर नियंत्रण मिळविण्यात अजूनही यश आलेले नाही. वर्धा शहराच्याही अनेक भागात दारूची विक्री चोरट्या मार्गाने केली जाते. ब्रॅन्डेड दारू आणून त्यात भेसळ करण्याचेही प्रकार वाढले आहे. त्यामुळे पोटाच्या आजाराचे विकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयात असे रुग्ण आढळून येतात.
मध्यप्रदेशातून नागपूर मार्गे दारू जाम, समुद्रपूर मार्गे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात नियमीतपणे पाठविली जाते. समुद्रपूर पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा ही दारू पकडली. मात्र दारूची वाहतूक अजूनही बंद झालेली नाही. आलीशान वाहनातून नाना युक्त्या लढवित दारूची वाहतूक करणारी यंत्रणा सजगपणे काम करीत आहे. पोलिसांचे हप्तेही व्यवस्थित पाठविले जात आहे.
पोळ्यासाठी साठवणूक करण्यास सुरुवात
पोळा आठ दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे अवैद्य दारू व्यवसायात गुंतलेले लोक सध्या दारूची साठवणूक करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. पोळ्यासाठी काही दारू विक्रेत्यांकडे आगावू स्वरूपाची मागणी नोंदविण्यात आली आहे व त्यांचे अॅडव्हान्स पेमेंटही करणारे काही ग्राहक असल्याने त्यांची गरज लक्षात घेवून मोठ्या प्रमाणावर दारूसाठा जमा करण्याचे काम दारूविक्रेते करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सेलू तालुक्यातून सर्वाधिक पुरवठा
सेलू तालुक्याला नागपूर जिल्ह्याची सिमा लागलेली आहे. या भागांतून वर्धा शहरातही मोठ्या प्रमाणावर दारू पाठविली जाते. व तिची विक्री केली जाते. दारूचे दर अतिशय वधारलेले आहे. दारूच्या शिशीवर असलेल्या एमआरपीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक दराने त्याची विक्री करण्यात येत आहे.
१५ हजारांवर अधिक लोकांना रोजगार
दारूच्या अवैद्य व्यापारातून एकट्या वर्धा जिल्ह्यात १५ हजारांवर अधिक नागरीक, तरूण यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यात काही महिलांचाही समावेश आहे. अत्यल्प श्रमात मोठा मोबदला मिळत असल्याने दारूच्या व्यवसायात अनेक लोक गुतंलेले आहेत. साधारणत: महिन्याला लाखापर्यंत कमाई या व्यवसायातून काही लोक करीत आहेत.
रेल्वेनेही वाहतूक
नागपूर व देशाच्या इतर भागातून वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली या तीन जिल्ह्यात रेल्वे मार्गानेही दारू पोहचविली जाते. नागपूर येथून दारू भरून ती या तीन जिल्ह्यांकडे पाठविण्याचे काम केले जाते. अलीकडेच नवजीवन एक्सप्रेसमधून दारूची वाहतूक करताना दोन इसमांना अटक करण्यात आली होती. तर जळगाव येथेही चंद्रपूरकडे जाणारी दारू आठवडाभरापूर्वी पकडण्यात आली.
लोकप्रतिनिधीही जबाबदार
दारूबंदीचे चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या अॅड. पारोमिता गोस्वामी व त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी अवैद्य दारू रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांनी दरमहा आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती. परंतु गेल्या वर्षभरात दारूबंदीच्या विषयावर एकाही लोकप्रतिनिधीने बैठक घेतली नाही. त्यामुळे त्यांना अवैद्य दारूविक्रेत्यांची अधिक चिंता असल्याचे दिसून येत आहे.