मोझरी शेकापुरात दारूविक्रेत्यांची दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:06 PM2019-06-23T22:06:50+5:302019-06-23T22:07:09+5:30
मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्ह्याचे ाालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या तक्रारीतून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्ह्याचे ाालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या तक्रारीतून केली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी आहे. असे असताना शहरासह ग्रामीण भागात खुलेआम दारूविक्री होताना दिसते. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. अवैध दारूविक्रीला पोलिसांचेच अभय असल्याचा आरोप केला जात आहे.
मोझरी (शेकापूर) येथे आशीष राजकुमार भगत, सोनू राजकुमार भगत, मंगेश डोमाजी हे मागील कित्येक वर्षांपासून गावात राजरोसपणे दारूविक्री करीत आहे. त्यामुळे तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दारूविक्रेत्यांचे गावात दहशत पसरविणे, कुणालाही शिवीगाळ, मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहे. कित्येकवेळा दारूविक्रेते भाडोत्री गुंड आणून गावात दहशत पसरवितात. मात्र, पोलिसांकडून केवळ पैशाच्या हव्यासापोटी कारवाई केली जात नाही. बीट जमादार दारूविक्रेत्यांची पाठराखण करीत असल्याने दारूविक्री जोमात सुरू असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. कारवाईच होत नसल्याने दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले आहे. ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. दारूविक्रेत्यांचा आता पोलीस अधीक्षकांनीच कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच पुष्पा येरणे, उपसरपंच शुभ्रबुद्ध कांबळे, सदस्य लक्ष्मीकांत ढुमणे, आशा मून, शारदा भोयर, सूर्यकांत गजबे, संजय तेलंग, आशा मून, शारदा भोयर, शरद मांढरे, राजू धोबे, वसंत तुंडलवार, मुकिंदराव कांबळे, संजय कारामोरे, राजू कांबळे यांच्यासह १७८ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
ठराव, शाळेच्या तक्रारीकडे पोलिसांचा कानाडोळा
गावात होत असलेल्या अवैध दारूविक्रीविरुद्ध २४ जून रोजी सर्वानुमते ठराव घेण्यात आला. याशिवाय विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने या गंभीर बाबीकडे तक्ररीद्वारे लक्ष वेधले. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामसभेच्या ठरावाची प्रत सादर करण्यात आली. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने दारूविक्रीला शासन आणि प्रशासनाची मूकसंमती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.